रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
श्रीराम जन्मभूमीचं महत्त्व देशातील राम भक्तांसाठी खूप मोठं आहे. प्रभू रामाच्या अयोध्या नगरीत त्यांच्या भव्य मंदिराची स्थापना झाली हा दिवस देशाभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. अशातच आता अयोध्येत राम भक्तांच्या निवासासाठी महाराष्ट्र भवनाची उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या होणाऱ्या वास्तूसाठीचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी राज्य शासनाच्या सचिव मनीषा म्हैसकर, यूपीचे आमदार आदींची विशेष उपस्थिती होती.
हेही वाचा- पुण्यातील सर्वच्या सर्व जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढविणार ; शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती
अयोध्येत महाराष्ट्रामधून येणाऱ्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. प्रभू रामांचे मनोभावे दर्शन भाविकांना करता यावं, तसंच आयोध्येतील प्रभू रामांच महत्त्व काय होतं याची माहिती भाविकांना मिळावी या हेतूने महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचं सांगितलं आहे. राम मंदिर हे देशातील तमाम हिंदूसाठी अभिमानाची बाब आहे. या भव्य मंदिराची उभारणी झाल्यानंतर दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मंडळी तसंच राम भक्तांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. म्हणूनच लांबून येणाऱ्या भक्तांची योग्य रीतीने सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे महाराष्ट्र भवन उभारण्यात येत आहे.
हेही वाचा- भाजपचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाची ‘या’ जागेसाठी मागणी, न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा
हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते. यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली.भूमिपूजन झाल्याने आता भवनाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल आहे अशी प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली.