नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM) यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेत, त्यांचा सत्कार केला होता. हा पुरस्कार १६ एप्रिल (रविवारी) म्हणजे आज खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून, शहांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा देखील घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं मैदानावर मोठी गर्दी झाली आहे. (Maharashtra Bhushan Award)
श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी…
दरम्यान, खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीसेवक दाखल आहेत, 20 लाख श्रीसेवक येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यावेळी दाखल झालेल्या श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. गावाखेड्यातून, ग्रामीण भागातून, गावागावातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले आहेत. या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, सुरक्षा कटेकोट असावी, पोलिस बंदोबस्त तैनात असावा, आदीच्या तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळं या कार्यक्रमाला राज्यभरातून धर्माधिकारी यांचे अनुयायी येणार आहेत.
कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी?
डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्षे निरुपण करत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकी सुरू केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडे संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते. निर्माल्यातून खतनिर्मिती करून पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.