Maharashtra Breaking News Updates Today:
नवी दिल्ली: मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ‘रहेजा डेव्हलपर्स’ आणि त्यांचे प्रवर्तक नवीन रहेजा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सुमारे २,४०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी कंपनीची १,११४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
या जप्त मालमत्तांमध्ये रहेजांशी संबंधित ‘NA Buildwell’ आणि ‘Riyasat Palaces’ या कंपन्यांसह नवीन रहेजा यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. घर खरेदीदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा तपास सुरू होता. तपासात असे समोर आले आहे की, ४,६०० ग्राहकांकडून जमा केलेला सुमारे २,४२६ कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांच्या माध्यमातून संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी वळवण्यात आला.
29 Apr 2026 04:00 PM (IST)
बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाकाव्यपट राजा शिवाजी च्या साउंडट्रॅकमधील दुसरे गीत ‘जय शिवराय’ नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या गाण्याने चित्रपटाच्या संगीत प्रवासाला अधिक उंची प्राप्त करून दिली आहे. पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर या नव्या गीताकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, आणि त्या अपेक्षांवर हे गाणे पूर्णपणे खरे उतरल्याचे दिसून येते. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले ‘जय शिवराय’ हे गाणे केवळ प्रेरणादायी नसून एक भव्य आणि प्रभावी संगीत अनुभव देणारे आहे. दमदार ढोल-ताशांचा गजर, शक्तिशाली बीट्स आणि भव्य ऑर्केस्ट्रेशन यांचा संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. या संगीतातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द आणि त्यांच्या उदयाची कहाणी प्रभावीपणे उभी राहते.
29 Apr 2026 03:50 PM (IST)
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा संवाद, बुद्धिमत्ता, तर्क आणि निर्णयक्षमता यांचा ग्रह मानला जातो. बुध आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि आपण माहितीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकतो. गुरुवार, ३० एप्रिल रोजी बुध मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करेल आणि १५ मेपर्यंत तेथेच राहील. या राशीतील बुधाचे आगमन कुंभ राशीसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. तुमची वाणी खूप प्रभावी होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठा फायदा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. बुध ग्रहाचे संक्रमण बुधादित्य योग निर्माण करत असल्यामुळे याचाही तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. बुध संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे ते जाणून घ्या
29 Apr 2026 03:40 PM (IST)
Tata IPL 2026 MI Vs SRH Live Updates: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध एसआरएच असा सामना रंगणार आहे. आयपीएलचा आज 41 वा सामना असणार आहे. मुंबई इंडियन्सची कमबॅक करण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे एसआरएसच आपला विजयी रथ वेगाने पुढे नेण्याचा (IPL 2026) प्रयत्न करणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. इथली बाउंड्री लहान असल्यामुळे आणि खेळपट्टीत नैसर्गिक बाऊन्स त्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे जास्त सोपे समजले जाते. त्यामुळे टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
29 Apr 2026 03:30 PM (IST)
दिवसभर काम करून थकल्यानंतर प्रत्येकालाच भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात वडापाव, सामोसा, शेवपुरी इत्यादी चविष्ट पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा काहीवेळाने खूप जास्त भूक लागते. भूक लागल्यानंतर तिखट आणि तेलकट पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट तयार होणारे मॅगी स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. याशिवाय लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यास या पद्धतीने मॅगी स्प्रिंग रोल तुम्ही बनवू शकता. मॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी जास्त साहित्य सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मॅगी स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
29 Apr 2026 02:58 PM (IST)
शब्दाचा पक्का माणूस म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे.. त्यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय सुरु झालं, असं प्रतिपादन बच्चू कडू यांनी केलं आहे.
29 Apr 2026 02:40 PM (IST)
कोल्हापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला ६ दिवसांची पोलिस कोठली सुनावण्यात आली आहे. आज वडगाव कोर्टात शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांना हजर करण्यात आले होते. शाहिद सनदे याच्यावर आणखीही एक गुन्हा दाखल आहे.
29 Apr 2026 02:29 PM (IST)
नाशिकमध्ये अंघोळीचा साबण खाल्याने एका २० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अथर्व द्विवेदी असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याने साबण खाल्याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हा तरुण स्पेशल चाइल्ड असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्याबद्दल इंदिरा नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
29 Apr 2026 02:20 PM (IST)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हालोली गावाच्या पाडोस पाडा परिसरात भरधाव कारने महामार्ग ओलांडत असलेल्या माय-लेकांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, अपघातानंतर कार महामार्गालगत उलटली. गुजरात वाहिनी परिसरात घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती
29 Apr 2026 02:11 PM (IST)
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थालपथीचे शिर्डीच्या साई मंदिरात आगमन झालं आहे. विजयला बघण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. TVK पक्षाची स्थापना करत तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत विजयची दमदार एंट्री केली आहे.
29 Apr 2026 02:02 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सेव्हन हिल पूल ते भाजीवाली बाई चौक या दरम्यान सुरू असलेल्या कारवाईला स्थानिकांकडून विरोध होत आहे. महानगरपालिकेच्या पथकाने आज सकाळपासून सेव्हन हिल पूल ते भाजीवाली बाई चौक या परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.
29 Apr 2026 02:00 PM (IST)
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग पंजाब किंग्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना आढळला. ही घटना मंगळवारी रात्री मुल्लानपूर येथे घडली. राजस्थानच्या डावाच्या १६ व्या षटकादरम्यान, थेट प्रक्षेपण सुरू असताना परागच्या हातात व्हेपिंग डिव्हाइस दिसले, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार, ड्रेसिंग रूम आणि स्टेडियम परिसरात धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, मात्र काही विशिष्ट ठिकाणी त्याला परवानगी आहे. आता नक्की रियान परागवर काय कारवाई होणार याचीच चाहत्यांना चिंता आहे.
29 Apr 2026 01:55 PM (IST)
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपला पक्ष विलीन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व चर्चांबाबत बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
29 Apr 2026 01:50 PM (IST)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघासह अनेक महत्त्वाच्या जागांचा समावेश असलेल्या १४२ विधानसभा जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. २३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के विक्रमी मतदान झाले, जे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. याचदरम्यान, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १७७ वर भाजपचे उमेदवार देबांशु पांडा यांनी हा आरोप केला आहे. ते मतदारसंघातील विविध भागांची पाहणी करत होते. त्यांना ईव्हीएमची पाहणी करू दिली नाही. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जर ही तक्रार खरी असल्याचे आढळले, तर फेरमतदान घेतले जाईल.
29 Apr 2026 01:40 PM (IST)
भारताच्या पायाभूत सुविधांच्या नकाशावर आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा आहे. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘गंगा एक्सप्रेसवे’चे आज, २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते हरदोई जिल्ह्यातील मल्लावन येथे उद्घाटन होत आहे. ३६,००० कोटी रुपये खर्चून उभारलेला हा एक्सप्रेसवे मेरठ आणि प्रयागराज या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हा रस्ता प्रत्यक्षात तयार असतानाही गुगल मॅप्सवर तो का शोधता येत नाही, याबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
29 Apr 2026 01:35 PM (IST)
नेपाळच्या (nepal) राजकारणात एक नवे युग अवतरले आहे. अवघ्या ३५ व्या वर्षी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळणाऱ्या बालेन शाह यांनी आपल्या ‘Ghanti’ (घंटी) सरकारमार्फत प्रशासकीय सुधारणांचा धडाका लावला आहे. नेपाळच्या परराष्ट्र धोरणात पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी त्यांनी राजदूत पदांच्या नियुक्त्यांसाठी ‘ओपन व्हॅकन्सी’ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या देशाचे प्रतिनिधी (Ambassador) स्पर्धात्मक प्रक्रियेतून निवडले जातील.
29 Apr 2026 01:25 PM (IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने येत्या १५ मे पासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी खबरदारी म्हणून पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
29 Apr 2026 01:15 PM (IST)
जळगाव येथून अपघाताची बातमी समोर आली आहे. नवरीला परत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. क्रुझर वाहनाचे पुढील चाक निखळल्यामुळे वाहन ट्रकला धडकले आणि ही धडक इतकी भीषण होती की यात वाहन पलटी झाले आहे. या दुर्दैवी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहे. ही हृदयद्रावक घटना धरणगाव तालुक्यातील वराड सिम येथे घडली.
29 Apr 2026 01:08 PM (IST)
नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाची स्थगिती कायम १९ जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे.
29 Apr 2026 01:06 PM (IST)
आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाने (यूआयडीएआय) एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले की, आधार कार्डला आता जन्मदिनाचा पुरावा मानले जाऊ नये. आधार कार्डवरून तुमची ओळख सिद्ध होऊ शकते. मात्र, तुमच्या जन्माची तारीख नाही.
29 Apr 2026 12:59 PM (IST)
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रभादेवी या ठिकाणी आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी 22 मिनिटं त्यांना ओला उबेर आणि टॅक्सी मिळाली नाही. अनेक टॅक्सीना हाक मारली. मात्र काही टॅक्सीवाल्याने त्यांना गाडी थांबवली नाही. त्यामुळे रियालिटी चेक या व्हिडिओमधून त्यांनी केली आहे. सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 22 मिनिटं मला उभे राहावे लागले. मात्र टॅक्सी आणि ओला उबेर मिळाली नाही. काही टॅक्सी, ओला, उबेर असताना सुद्धा त्यांनी मला घेतले नाही, अशा प्रकारचा अनुभव त्यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे सांगितला आहे.
29 Apr 2026 12:47 PM (IST)
युद्धामुळे महाग झालेल्या कच्च्या तेलामुळे आणि डॉलर महागल्याने आता विधानसभा निवडणुका होताच भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किमान 5 रुपयांनी वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या भारताला महाग कच्चे तेल आयात करावे लागत आहे. इतर देशांनी महाग कच्च्या तेलामुळे आधीच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. भारतात पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे ही दरवाढ थांबवण्यात आली होती, अशी चर्चा होती. आता 29 तारखेला बंगालमध्ये मतदान आहे. त्यानंतर 4 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.
29 Apr 2026 12:34 PM (IST)
भारतात उष्माघातामुळे वाढणारे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. 2019 ते 2023 दरम्यान उष्माघातामुळे 3,712 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी आयोगाने समोर ठेवली आहे.
29 Apr 2026 12:28 PM (IST)
भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना दिल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधाचा तपास लावण्यात एसआयटीला अद्यापही यश आले नसून हे औषध कोणते? ते खरात कुठून मागवत होता, याबद्दल गूढ कायम आहे. नाशिकमधील भोंदू खरातविषयी अनेक पीडितांनी शारीरिक शोषणाच्या तक्रारी केल्या. एसआयटीने हे गुंगीकारक औषध शोधण्यासाठी नाशिक शहरातील दोन डॉक्टरांची चौकशीही केली होती.
29 Apr 2026 12:17 PM (IST)
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचे राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी त्यांचा 92 मतांनी पराभव केला आहे.
29 Apr 2026 12:05 PM (IST)
महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या महासंघात राज्यातील 393 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. महत्त्वाचं म्हणजे महासंघाच्या कार्यकारणी समितीत अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड करण्यात आलीय.
29 Apr 2026 12:05 PM (IST)
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर टायर फुटल्याने चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. वाहनातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, यात नुकतच लग्न झालेल्या नववधूचा देखील समावेश आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून, एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.
29 Apr 2026 11:40 AM (IST)
जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी (ता.जुन्नर) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील शेततळ्यात घडली. शेततळ्याकडे तीन मुले गेली असताना त्यातील सोहम जयसिंग नवले (वय १२) हा मुलगा प्रथम तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला विघ्नेश महेश पवार (वय ८, रा. बल्लाळवाडी) हा दुसरा मुलगा तळ्यात उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना उपस्थित असलेला तिसरा मुलगा कार्तिक नवले याने पाहताच त्याने तात्काळ घरी जाऊन माहिती दिली.
29 Apr 2026 11:30 AM (IST)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मस्साजोग ग्रामपंचायतीवर स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. स्वरुपानंद देशमुख यंनी दिवंगत संरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर सरपंच पद रिक्त झाले होते. स्वरूपानंद देशमुख यांनी अवघ्या ९२ मतांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. गावच्या आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी मोठी ताकद लावली होती. पण अखेर ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने आपला कौल दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला.
29 Apr 2026 11:20 AM (IST)
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा भारताचा शेजारी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. सध्या पाकिस्तान (Pakistan) मोठ्या इंधन संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री मुसादिक मलिक यांनी खळबळजवन विधान केले आहे. त्यांनी देशातील ढासळत्या स्थितीबाबत कबुली देत भारताच्या मजबुलत धोरणांचे कौतुक केले आहे. तर स्वत:च्या सरकारचे वाभाडे काढले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
29 Apr 2026 11:15 AM (IST)
चीनमधील टेक कंपनी वनप्लसने पुन्हा एक नवा स्मार्टफोन लाँच करत त्यांच्या ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. कंपनीने चीनमध्ये त्यांचा बहुप्रतिक्षित OnePlus Ace 6 Ultra स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस ब्रँडच्या लेटेस्ट परफॉर्मंस-फोकस्ड स्मार्टफोन लाइनअपमध्ये OnePlus Ace 6 आणि Ace 6T सोबत समाविष्ट होणार आहे.
29 Apr 2026 11:10 AM (IST)
सायन-पनवेल हायवेवरील वाशी ब्रिजजवळ बीएमसीच्या कामादरम्यान पायलिंग रिग मशीन उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला असून सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
29 Apr 2026 11:00 AM (IST)
अलीकडच्या काही वर्षांत लाखो विद्यार्थी परदेशातून व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी (MBA) करण्याचा विचार करत असतात. पण परदेशातील नेमकं कोणत्या कॉलेजमधून किंवा विद्यापीठातून एमबीए करायचे याची माहितीच या विद्यार्थ्यांना नसते. अशातच फायनान्शियल टाइम्सने २०२६ जागतिक बिझनेस स्कूलची क्रमवारी जाहीर केली आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणींनी अमेरिकेतील कैम्ब्रिज येथे स्थित या बिझनेस स्कूलमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहिले असेल. मग आता या स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे, हे आज आपण जाणून घेऊया.
29 Apr 2026 10:50 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त विधाने आणि धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. आत ट्रम्प यांनी वादग्रस्त पाउल उचलले आहे. अमेरिकेच्या अधिकृत पासपोर्टवर आता ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी झळकणार आहे. अमेरिकेन स्वातंत्र्याच्या २५० व्या दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.
29 Apr 2026 10:40 AM (IST)
सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून ओबीसी महिला राखीव कोट्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीवर वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेत Santosh Salunkhe यांनी संबंधित समितीकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावर संतोष साळुंखे यांनी जात पडताळणी समितीकडे हरकत घेतली होती. या तक्रारीवर २८ एप्रिल रोजी सुनावणीची प्रक्रिया हरकतदार आणि झेडपी अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकीलांच्या उपस्थितीत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांच्यासमोर पार पडले. हरकतदारांचे वकील अॅङ घोडके यांच्या मागणीनुसार प्रिया शिंदे यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे समितीने त्यांच्या हवाली सुपूर्द केली आहे. आता पुढची सुनावणी दि. १९ मे रोजी होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला.
29 Apr 2026 10:30 AM (IST)
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोडमध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रमेश रेड्डी असे आहे. या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
29 Apr 2026 10:20 AM (IST)
आझाद नगर परिसरातील मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड सातारा नगरपालिकेने मंगळवारी दुपारी जमीनदोस्त केले. सुमारे सहा गुंठे क्षेत्रफळाच्या या जागेवर बगीचासाठी आरक्षण असतानाही अतिक्रमण करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. सदर शेड अडसूळ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी नगरपालिकेकडून नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले.
29 Apr 2026 10:10 AM (IST)
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या ॲनिमे लवर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्री फायर मॅक्सने प्रसिद्ध जपानी ॲनिमे सीरीज Gintama सोबत भागिदारी करण्याची घोषणा केली आहे. या भागिदारीनंतर आता गेममध्ये अनेक गेमिंग ईव्हेंट्स लाईव्ह करण्यात आले आहे. यामधील एक ईव्हेंट आहे फ्री फायर मॅक्स रोल कॉल ईव्हेंट. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 1000 हून अधिक गोल्ड, गोल्ड रॉयल वाउचर, गिंटमा अवतार आणि रेंडम लूट क्रेट सारखे अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना इन गेम करंसी डायमंड्स खर्च करण्याची आवश्यकता नाही.
29 Apr 2026 09:59 AM (IST)
मुंबई : राज्यातील पर्यावरण व हवामान बदल विभागाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले तलाव संवर्धन प्रकल्प रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेली रक्कम व्याजासह परत घेण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती पर्यावरण विभागातून देण्यात आली. भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विभागाने एकूण १४ तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे.
29 Apr 2026 09:53 AM (IST)
भारतात 29 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,092 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,834 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,319 रुपये आहे. भारतात 29 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,50,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,190 रुपये आहे. भारतात 29 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.
29 Apr 2026 09:43 AM (IST)
जागतिक ऊर्जा क्षेत्रात सध्या एका मोठ्या युगाचा अंत होताना दिसत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) १ मे २०२६ पासून तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ (OPEC) आणि ‘ओपेक+’ मधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे (US-Israel vs Iran) आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील विस्कळीत तेल पुरवठ्यामुळे आधीच तेलाचे दर प्रति बॅरल ११० ते ११३ डॉलर्सच्या वर गेले असताना युएईचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
29 Apr 2026 09:30 AM (IST)
गोध्रा: गुजरातच्या राजकारणातून सामाजिक सलोख्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश समोर आला आहे. धार्मिक संदर्भांनी चर्चेत राहणाऱ्या गोध्रा शहरात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एका हिंदू महिला उमेदवाराने मुस्लिम बहुल वॉर्डातून विजय मिळवून नवा इतिहास रचला आहे.
गोध्रा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून अपेक्षाबेन नैनेशभाई सोनी या अपक्ष उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. विशेष म्हणजे, या वॉर्डात १०० टक्के मुस्लिम मतदार असून अपेक्षाबेन स्वतः या वॉर्डाच्या मतदारही नाहीत.
29 Apr 2026 09:25 AM (IST)
मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या ९ जागांसाठी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले असून, यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, महायुतीचे दोन उमेदवार संख्याबळाच्या जोरावर सहज निवडून येतील, मात्र अतिरिक्त मते आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर दहावा उमेदवार मैदानात उतरवण्याबाबत विचार सुरू आहे. अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, यासाठी घटक पक्षांनी आग्रह धरला असतानाच शिंदे गटाच्या या पवित्र्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
29 Apr 2026 09:20 AM (IST)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा प्रवास जाणीवपूर्वक केलेला नसून ती एक 'प्रशासकीय चूक' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पार्थ पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत माहिती दिली की, शरद पवार यांच्या स्नेहभोजनासाठी मुंबई ते पुणे प्रवासाचे नियोजन घाईघाईत करण्यात आले होते. "विमान प्रवासाचे बुकिंग शेवटच्या क्षणी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने या कंपनीचे विमान बुक झाले. विमानापर्यंत पोहोचेपर्यंत मला ते विमान 'व्हीएसआर' कंपनीचे असल्याचे माहित नव्हते," असे त्यांनी स्पष्ट केले. या चुकीची गंभीर दखल घेत संबंधित बुकिंग एजंटचा करार रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
29 Apr 2026 09:15 AM (IST)
दुबई: जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडालेली असून, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) तेल उत्पादक देशांची प्रमुख संघटना असलेल्या 'ओपेक' (OPEC) आणि 'ओपेक प्लस'मधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ मे पासून यूएई या दोन्ही संघटनांचे सदस्यत्व अधिकृतपणे सोडणार आहे.
सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात तेल उत्पादन धोरणावरून निर्माण झालेल्या अंतर्गत मतभेदांमुळे हा निर्णय घेतल्याचे समजते. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊन आधीच तेल पुरवठा विस्कळीत झाला असताना, यूएईच्या या पावलामुळे जागतिक तेल बाजारात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. १९६० मध्ये स्थापन झालेली 'ओपेक' संघटना जागतिक स्तरावर तेल उत्पादन आणि किंमतींवर नियंत्रण राखण्याचे काम करते.
29 Apr 2026 09:10 AM (IST)
मुंबई: आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने प्रदीर्घ चर्चेनंतर या पाच नावांवर शिक्कामोर्तब केले असून, याद्वारे पक्षाने संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. या उमेदवार निवडीत भाजपने जातनिहाय समीकरणे आणि 'सोशल इंजिनिअरिंग'वर विशेष भर दिला आहे. आयारामांना झुकते माप दिले जाते या टीकेला उत्तर देत, यंदा पक्षाने निष्ठावंत चेहऱ्यांना संधी देऊन कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला आहे.
29 Apr 2026 09:05 AM (IST)
पुणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट यार्डातील तरकारी, गूळ-भुसार, फूलबाजार, कांदा-बटाटा, पान आणि केळी बाजार यांसह सर्व प्रमुख विभाग शुक्रवारी बंद राहतील.
याशिवाय, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंप, वजन काटा विभाग आणि मोशी, खडकी, उत्तम नगर, मांजरी हे उपबाजारही पूर्णपणे बंद राहणार आहेत. या दिवशी खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार होणार नसल्याने शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






