Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी पवार कुटुंबाची बोलवली तातडीची बैठक
Baramati Politics: बारामतीच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची ही तातडीची बैठक होणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवारांनी ही बैठक बोलावल्याने चर्चांना उधाण आले आहे.
या बैठकीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे. 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशीच रोहित पवार आणि जय पवार यांनी काही विधाने केली होती. 2029 मध्ये होणारी बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
बारामतीत मतदान घटले, बालेकिल्ल्यात गटबाजीचा फटका, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज
आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत आपण बारामती विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतो, असे संकेत जय पवार यांनी दिले होते. जय पवार यांच्या विधानावर आमदार रोहित पवार यांनी, शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार उमेदवार असतील, असे संकेत दिले. दोघांच्याही या वक्तव्यानंतर बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या विषयावर शरद पवार आज काही भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात आज त्यांनी ही बैठक बोलवली असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या बैठकीला रोहित पवार, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार हेही बैठकीत सहभागी होऊ शकतात. श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत. तर राजेंद्र पवार हे त्यांचे चुलत बंधू आहेत. कौटुंबिक तसेच राजकीय अशा दोन्ही स्तरांवरील विषयांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. बैठकीनंतर पवार कुटुंबातील एखादा सदस्य माध्यमांसमोर येऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मतदानाच्या दिवशी श्रीनिवास पवार यांना भाजपकडून पवार कुटुंबात राजकारण घुसवले जात आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना, “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला स्वतःलाच काय चाललं आहे ते समजत नाही. पवार कुटुंब हे राजकारणातलं जुने कुटुंब आहे, हे समजून घेतलं पाहिजे,” असे स्पष्ट उत्तर दिले.






