"कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची भीती…", राज्यात 'या' भागात मॉक ड्रिलचे आयोजन (फोटो सौजन्य-X)
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आज (7ल मे) आयोजन करण्यात आले. तसेच, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दक्षता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. त्यानुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी (CSMT) स्थानकात मॉक ड्रिल घेण्यात आले.
युद्धसदृश परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मॉक ड्रील करण्यात आले.
यापूर्वीही या महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. ३२ वर्षांपूर्वी, १२ मार्च १९९३ रोजी, मुंबई स्टॉक एक्सचेंजसह अनेक पंचतारांकित हॉटेल्सना एकामागून एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. त्या हल्ल्यात मुंबई महानगरपालिकेत स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, परंतु स्फोटके वेळेवर पोहोचू न शकल्याने बीएमसीची भव्य इमारत वाचली.
सुमारे १७ वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे आणि मुंबईचा अभिमान मानला जाणारा ताज हॉटेल देखील लक्ष्यित करण्यात आला होता. याशिवाय, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये, मुंबईच्या लोकल ट्रेनना दोनदा, गेटवे ऑफ इंडियाला एकदा आणि मुंबादेवीच्या दाट बाजारपेठांना एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईवर हल्ला करण्यासाठी समुद्री मार्गाचा दोनदा वापर करण्यात आला आहे. सरकार भूतकाळातील घटनांपासून धडा घेत आहे आणि सर्व महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करत आहे.