महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर उपस्थित होत्या.
14 राज्यांमधील 17 मुलांचा गौरव
या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा 14 राज्यांमधील10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.
वीर बाल दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून 2022 पासून 26 डिसेंबर या दिवशी ‘वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यात येते. शीख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय 9) आणि बाबा फतेहसिंग (वय 5) यांच्या असीम शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दोघांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.
करीना थापाने वाचवले 70 जणांचे प्राण
अमरावतीच्या कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले. करिनाला बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, तिने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
साहित्य आणि समाजकार्याची ओळख बनली केया हटकर
मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या ‘डान्सिंग ऑन माय व्हिल्स’ आणि ‘आय एम पॉसीबल’ ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. 13 वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केयाला 10 महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसित आहे, ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.






