महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी
उद्धव ठाकरे यांच्या सहा विश्वासू खासदारांनी नुकताच ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश् उपस्थित होऊ लागले आहेत. या कठीण काळात उद्धव ठाकरे यांची नाराजीही उघडपणे समोर आली. या बैठकीत त्यांनी उपस्थित नेत्यांना “आपण खरोखरच एकत्र आहोत का?” असा थेट प्रश्न विचारला.
दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती आखण्याच्या उद्देशाने बोलावण्यात आलेल्या या बैठकीत अनेक प्रमुख नेते आणि आमदार अनुपस्थित होते. पण त्याचवेळी २३ आमदार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील बैठकीला आले नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.
तर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे देखील बैठकीला गैरहजर होते. वडेट्टीवार यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. चार वर्षांत दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
बंडखोर खासदारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नेत्यांना आवाहन केले की, “आपण आपल्यासोबत असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे निघून गेले, त्यांना जाऊ द्या. आपण म्हणतो की आपण एकत्र आहोत. पण सभागृहात महाविकास आघाडी म्हणून आपण एकजूट आहोत का? आपण एकत्रितपणे मुद्दे मांडतो का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि एकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.






