कल्याण : जुन्या भांडणाच्या रागातून चाकूने वार करून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये (Kalyan News) घडली आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एकाने तरुणाची हत्या (Kalyan Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.अमोल लोखंडे असं मृत तरुणाचं नाव आहे. जयेश डोईफोडे असं आरोपीचं नाव आहे.(Kalyan Crime News)
कल्याण पुर्वेतील ईश्वरी क्लासेसजवळ नवीन दुर्गा माता मंदिर रोड काटेमानिवली येथे सोमवारी रात्री 11.00वाजण्याच्या सुमारास अमोल लोखंडेवर पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी टक्या उर्फ जयेश डोईफोडे याने चाकूने वार केला. जयेशने अमोलच्या पोटावर, छातीवर, हाताच्या दंडावर अनेक वार केल्याने अमोल लोखंडेचा (वय 39 वर्षे) जागीच मृत्यू झाला. जयेश डोईफोडे यांच्यावर फिर्यादी ममता गर्भे यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भा.दं.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी जयेश डोईफोडे याला अटक करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे पो.नि. एस. जी.गवळी याप्रकरणी तपास करीत आहेत.
कसला होता राग?
आरोपी जयेश डोईफोडे हा सराईत गुन्हेगार आहे. अमोल आणि जयेशमध्ये आधीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी अमोल लोखंडे याने आरोपीच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असं विचारलं. यामुळे आरोपी चिडला होता. आरोपीने याच गोष्टीचा राग मनात धरुन तरुणाचा काटा काढला. अमोल काल रात्री परिसरात उभा असताना आरोपींनी मागून येऊन त्याच्यावर हल्ला केला.
हत्या करून स्वत:ला मारहाण झाल्याचा रचला बनाव
अमोलची हत्या केल्यानंतर आरोपी जयेश डोईफोडे हा स्वतः कल्याण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याला मेमो देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. काही वेळाने पोलिसांना हत्येची माहिती मिळाली. तसेच जयेशने ही हत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.