जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची महत्त्वाची बैठक घेतली. यानंतर जरांगे पाटील यांनी निवडणूकांबाबतचा त्यांच्या निर्णय जाहीर केला आहे. जरांगे पाटील प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार उभा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
निवडणूकांबाबत माध्यमांसमोर भूमिका मांडताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला मराठ्यांनी मतदान करा. कार्यक्रम मात्र शंभरटक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा. लोकांना आधी उमेदवार द्यावा लागतो. तोही स्वच्छ चारित्र्याला असावा लागतो. मग त्याला मतदाराकडे मते मागावा लागतात. आपल्याकडे आधी मतं आहेत. उमेदवार कोणीही असूदेत. लोकांसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. सात महिन्यांत मी मराठ्यांना एकदाही हरू दिलं नाही. राजकारणाच्या नादात मी माझी जात हरू देणार नाही. पण या आव्हानावर उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवारही देता येणार नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्याचया. कोणालाही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असा थेट सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना दिला आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणूकीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभा करणार असे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, पुण्याचे नेते वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राज्यामध्ये नवीन युतीची समीकरणे दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेमधून राजकारणामध्ये येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.