गोव्याचे कृषीमंत्री व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन
रवी नाईक यांचे घर गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या निधनाने गोवा तसेच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी ३ वाजता पार पडणार आहेत.
रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते गोव्याच्या राजकारणात सक्रीय होते. काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी १९८० च्या दशकात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) मधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
रवी नाईक यांनी दोनदा गोव्याचे मुख्यमंत्रीप भुषवले. १९९१ मध्ये थोडक्यात आणि १९९४ मध्ये पुन्हा, एकूण अंदाजे ८५० दिवस. ते लोकसभेवर निवडून आले आणि १९९८ ते १९९९ पर्यंत संसद सदस्य म्हणून काम केले.
नाईक हे अनेक वर्षे काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा
नाईक हे अनेक वर्षे गोव्यात काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा होते. २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या काही काळापूर्वी, नाईक भाजपमध्ये सामील झाले आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली.
रवी नाईक यांच्या निधनानंतर गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आमचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री रवी नाईक जी यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. गोव्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते, मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी दशकांपासून केलेल्या समर्पित सेवेने राज्याच्या प्रशासनावर आणि जनतेवर अमिट छाप सोडली आहे. त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि सार्वजनिक कल्याणातील योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर पोस्ट करत नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. “गोवा सरकारमधील मंत्री रवी नाईक जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. गोव्याच्या विकासाच्या मार्गाला समृद्ध करणारे अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक म्हणून त्यांचे स्मरण केले जाईल. ते विशेषतः वंचित आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी उत्सुक होते. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना माझी संवेदना. ओम शांती,” असे मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत नाईक सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.त्यांनी सहा वेळा पोंडा आणि एकदा मार्काईम या विधानसभा मतदारसंघांतून विजय मिळवला. विविध राजकीय टप्प्यांत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी), काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व केले. १९८४ मध्ये एमजीपीच्या तिकिटावर पोंडा येथून प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या नाईक यांनी १९८९ मध्ये मार्काईम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर १९९९, २००२, २००७ आणि २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले. २०२२ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा पोंडा येथून निवडणूक जिंकली होती.






