जत महापालिका निवडणूक मतदार यादीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Local Body Elections : प्रवीण शिंदे: जत : आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जत नगर परिषदेची कच्ची मतदार यादी आणि प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मोठा घोळ झाला असून शहरातील जवळपास सर्वच प्रभागात बोगस मतदार, दुबार नावे, मयत नावे समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमदाडे गटाने केलेल्या या आरोपामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रश्नावर आम्ही हरकती नोंदवल्या असून, राज्य निवडणूक आयोग, जिल्हा, तहसील आयोगाकडेही तक्रारी दाखल केल्या आहेत. यात सुधारणा न झाल्यास प्रसंगी कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून निवडणुकीलाच स्थगिती आणू असा इशारा जमदाडे गटाचे प्रमुख माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी आणि प्रा. हेमंत चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
या जतमधील पत्रकार परिषदेला नेते प्रकाशराव जमदाडे, चंद्रकांत गुडडोडगी हे देखील उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले की, “जत पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि कच्ची मतदार यादी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे मतदार याद्यांची आम्ही तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक मतदारांची नावे आढळून आली आहेत. प्रभाग क्रमांक नऊमध्ये तब्बल २५० मतदार बोगस असल्याचे दिसून आले आहेत. यात प्रामुख्याने शहरातील दुसऱ्या प्रभागातील नावांपासून ते अगदी जत तालुक्यातील काही गावांपासून ते कवठे महांकाळ, मिरज, सांगली येथील मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. तसेच भाग क्रमांक दुसऱ्या प्रभागाचा आणि मतदारांची नावे मात्र या प्रभागात असे प्रकार देखील झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, बोगस, दुबार, मयत मतदार, बाहेरचे मतदार घुसवल्याचे प्रकार ज्या प्रकारे राज्यभर, देशभर उघडकीस आले आहेत, तसाच प्रकार जत पालिका क्षेत्रात झाला आहे. प्रत्येक प्रभागातील मतदार यादयांची छाननी, तपासणी केली तर जवळपास दोन हजार ते अडीच हजार अतिरीक्त आणि बोगस मतदार आढळून येतील. जर अशा प्रकारे जर प्रभागाची रचना. मतदारांचे गणोत्तर प्रमाणात बरीच तफावत होईल. यामुळे प्रभाग रचना देखील सदोष होऊन निवडणूक प्रक्रिया देखील चुकीच्या पध्दतीने होऊ शकते. हा एकप्रकारे आदर्श आचारसंहीता, निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीवरचा मोठा घाला ठरू शकते. आम्ही प्रभाग नऊ मधील पुरव्यानिशी दोनशे हरकती निवडणूक विभागाकडे नोंदवल्या आहेत, असे जमदाडे गटाने सांगितले आहे.
या प्रभागात भाग क्रमांक १२७ व १२९ येतो. परंतु कच्ची मतदार यादीत भाग क्रमांक १२१, १२२, १३, १२४, १२५ मधील नावे समाविष्ट झाली आहेत. शिवाय ज्या गावांचा पालिका हददीत समावेश नाही अशा तालुक्यातील शिंगणापूर, बाज, आसंगी तर मिरज तालुक्यातील बेडग, सांगली, कवठे महांकाळ येथील शेकडो मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
त्यामुळे ही जत पालिका आहे की शहराचा विस्तार थेट सांगलीपर्यंत झाला आहे हा प्रश्न आंम्हाला पडला असल्याचे भैय्या कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच मयत यादीकडे तर निवडणूक विभागाच्या यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले आहे. या प्रभागात ६५ मयत मतदारांची नावे जशीच्या तशीच ठेवली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी सभापतींचेही नाव
मोहन कुलकर्णी म्हणाले, जत तालुक्यातील बाज गणातून विजयी झालेल्या सदस्या आणि सभापती पदावर काम केलेल्या लक्ष्मी मासाळ यांचे नाव जर आमच्या प्रभागात समविष्ट होत असेल तर हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक झाला आहे. या याद्या करताना पालिकेचे काही कर्मचारी, अधिकारी, बीएलओ यांनी कुणाच्या तरी दबावाला बळी पडून आणि निवडणुकीत विजय सोपा करून घेण्याच्या दृष्टीने फार विचारपूर्वक यंत्रणा राबवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कडक शासन करावे अशी आमची मागणी आहे.
प्रभाग रचना सुसंगत नाही
हेमंत चौगुले म्हणाले की, मुळात प्रभाग रचना देखील सुसंगत नाही. रस्ते, नाले, वस्त्या, ओढा यांच्या सीमा रेषीत करताना देखील अनेक चुका झाल्या आहेत. यामुळे मतदारांचे गुणोत्तर प्रमाण, बोगस मतदार अशी संख्या वाढून ही रचना देखील सदोष असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे याची स्थानिक चौकशी करून मतदार यादी अंतिम करावी लागेल. ज्या चुका, शंका निर्माण झाल्या आहेत, त्याचे निवडणूक विभागाने अवलोकन करून मगच प्रक्रीया राबवावी लागेल. कारण शहराच्या प्रत्येक प्रभागात असे घोळ झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.