मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आरक्षणावरुन वाद निर्माण झाला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : मराठवाडा : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केल्यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझिट देखील महायुती सरकारकडून लागू करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके भूमिका व्यक्त करत असून त्यांनी जरांगे पाटलांसह मराठा समाजावर तीव्र टीका केली होती. यावेळी त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये देखील केली. या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत त्याच्यावर काही बोललो नाही, तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळी प्रमाणे समजतो. अजित पवारांचे दोन कार्यकर्ते धनंजय मुंडे, आणि छगन भुजबळ यांनी त्यांना हाताखाली धरलं आहे, त्यांना काही बोलता येत नाही, म्हणून ते यांच्या तोंडून त्यांची भाषा वधून घेत आहेत. त्यांचे विचार बीड जिल्ह्यात येऊन पाजाळ्याचे काम करू नका, त्या दोघांना बोलता येईना म्हणून, त्या दोघांनी तुम्हाला हाताखाली धरलं आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही वैचारिक विरोध करत होता, आरक्षणाबद्दल बोलत होता, तोपर्यंत ठीक होतं. पण आता तुम्ही आमच्या अस्मितेपर्यंत पोहोचला आहात, त्यामुळे तुम्ही कोणाच्या विचाराचे माणूस आहात, हे आम्हाला कळालं आहे. म्हणून धनगर लोक त्यांना जवळ करत नाही, मी त्यांच्यावर काहीच बोललो नव्हतो, त्याला देखील हेच कारण होतं, ते म्हणजे आम्हाला माहिती आहे, की यांचे गढूळ विचार आहेत. कुणाच्याही लेकीबाळीवर आम्ही आतापर्यंत बोललेलो नाही, कारण धनगराची लेक आहे, ती आमची पण लेक आहे. धनगर बांधवांच्या हे लक्षात आलेल आहे, की हे विनाकारण भांडण विकत घेत आहेत,” असा टोला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते लक्ष्मण हाके?
मनोज जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे राज्यात हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. यावरुन टीका करताना लक्ष्मण हाके यांनी लग्नाचा विषय काढत वादग्रस्त टीका केली. लक्ष्मण हाके म्हणाले की, “तुम्ही मागास झालात ना ? तर आता जरांगे यांना माझे सांगणे आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आलात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आपआपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने आता जातपात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे ११ विवाह जाहीर करू,” असे वक्तव्य हाके यांनी केले. यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले.