मंचर : आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे अनेक शेती, तरकारी पिके खराब झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अतिपावसामुळे गवार, कोबी फ्लॉवर, बीट,पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर खराब झाल्या आहेत. त्यामुळे सध्या पावसातून वाचलेल्या पिकांना चांगला बाजारभाव मिळत आहे. गवारीला सध्या ६० ते ७० रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची गवार वाचली. त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर ज्या शेतकऱ्यांची गवार पावसाने गेले. त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख मात्र सध्या पहावयास मिळत आहे.
पिकांवर रोगराई पसरली
आंबेगाव तालुक्यामध्ये एप्रिल, मे महिन्यात अनेक तरकारी पिकांची लागवड केली जाते. ही पिके जून, जुलैमध्ये काढणीस येत असतात. सध्या अनेक तरकारी पिके शेतामध्ये उभी आहेत. मात्र, मागील आठ ते दहा दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतात पाणी साचून अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिकांवर रोगराई पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. मात्र, मुरमाड खडकाळ भागातील जी पिके वाचली. त्या पिकांना सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे.
सध्या मागील आठ दिवसांपूर्वी २० ते ४० रुपये किलो असणारी गवार सध्या ६० ते ७० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची गवार सध्या तोडणीला असून, या पावसातून वाचली आहे. त्यांना चांगल्या स्वरूपाचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची गवार पीक या पावसामुळे खराब झाले, वाया गेले. त्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील दहा दिवस झालेल्या पावसाचा फटका शेतकरी वर्गाला बसला असून, काहींच्या चेहऱ्यावर समाधान तर काहींच्या चेहऱ्यावर दुःख मात्र दिसून येत आहे.