Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : महायुतीचे राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्व क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. यासाठी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधीमंडळामध्ये दाखल झाले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अधिवेशनला सुरुवात केली आहे.
03 Mar 2025 06:31 PM (IST)
कर्जत शहरात प्रवेश करणारा महत्वाचा रस्ता जेथून सुरु होतो त्या कर्जत चारफाटा येथून पुढे जाणारा रस्ता खड्डेमय झाला होता.त्या खड्ड्यांमुळे वाहनचालक संतापात झाले आहेत. त्यामुळे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखभाल दुरुस्ती असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ यांना खड्डेमुक्त रस्ता करण्याचे आदेश रविवारी दिले होते. दरम्यान आज सोमवारी श्रीराम पूल ते कर्जत चारफाटा भागातील रस्त्यावरील सर्व खड्डे नव्याने डांबरी पॅच भरले जात आहेत.दरम्यान, आमदारांच्या रोखठोक भूमिकेमुळे कर्जत येथे येणारा रस्ता खड्डेमुक्त बनला आहे.
03 Mar 2025 06:28 PM (IST)
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अस्थिर वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतीला पाणी देण्यासही मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला टाळठोको आंदोलन करण्यात आले.
03 Mar 2025 06:11 PM (IST)
कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत काचेचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून संबंधीत कारखानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे.
03 Mar 2025 06:07 PM (IST)
रात्री अपरात्री येणाऱ्या व जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधून मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर या चोरट्यांचा शोधासाठी कल्याण लोहमार्ग पोलीस या मेल एक्सप्रेस मध्ये गस्त घालत होते . याच दरम्यान एक सराईत चोरटा कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे रेल्वे शाखेच्या पथकाला मिळाली. रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे.
03 Mar 2025 06:05 PM (IST)
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर व्हावे, यासाठी अनेक वर्षे मागणी केली जात आहे. मात्र सध्याचं नेरळ ग्रामपंचायती मधील 100 कामगारांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत अशी स्थिती ग्रामपंचायतीची झाली आहे.मागील पाच महिन्यांचे पगार थकले असून नाव मोठे लक्षण खोटे असे नेरळ ग्रामपंचायती बद्दल बोलले जाऊ लागले आहे.दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाचे उप शहर प्रमुख संदीप उतेकर यांनी कामगारांचे पगार वेळेवर करण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे.
03 Mar 2025 05:55 PM (IST)
भंडारा शहरालगत असलेल्या ग्राम खोक रला येथील स्मशानभूमी जवळील रिकाम्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आरोग्याच्या समस्या उद्भवत असून, नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
03 Mar 2025 05:47 PM (IST)
अकोल्यामध्ये आज काँग्रेस कढून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी व खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेला सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकाला भाव जाहीर करावा. शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशके अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे या अशा विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
03 Mar 2025 05:19 PM (IST)
खासदार सुप्रिया सुळे या उद्यापासून (दि.04) पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. बनेश्वर फाटा येथील रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे सुप्रिया सुळे या उपोषणावर बसणार आहेत.
03 Mar 2025 05:07 PM (IST)
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय झाला असल्याचा दावा केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप, महायुती आणि जनहितासाठी राजीनामा घेणे महत्त्वाचे आहे, असे भाष्य केले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
03 Mar 2025 04:11 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील रांजणखार डावली नवखार गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे .या गावातील नागरिकांनी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरलय. पाचशे हून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झालेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा संताप व्यक्त करत जो पर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही असा पावित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे.मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
03 Mar 2025 02:56 PM (IST)
अमरावतीत सर्वपक्षीय 'शिवसन्मान' मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार गजानन लवटे सहभागी झाले होते. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा मोर्चा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरटकर आणि सोलापूरकर यांची आर्थिक चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी केला जात असेल तर हा महाराष्ट्र सहन करणार नाही, असा आक्रमक पवित्रा यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे.
03 Mar 2025 02:35 PM (IST)
अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. स्वीडनमध्ये, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्क्रीन वापरण्याची परवानगी नाही. मात्र आता भारताने या सर्व नियमांना वगळून एक नवीन दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आता विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्मार्टफोन वारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
03 Mar 2025 02:10 PM (IST)
Xiaomi चा सब-ब्रँड Poco ने भारतात POCO M7 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. POCO M7 5G स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत फक्त पहिल्या विक्रीसाठी असेल. या फोनची पहिली विक्री 7 मार्चपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
03 Mar 2025 01:55 PM (IST)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे.
03 Mar 2025 01:34 PM (IST)
धनंजय मुंडेंवर असलेल्या आरोपांमुळे सरकारवरही मोठा दबाव वाढला आहे. विरोधक आधीच त्यांना राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यामुळे या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या राज्याच्या नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
03 Mar 2025 12:58 PM (IST)
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राजकुमार बडोले यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
03 Mar 2025 12:33 PM (IST)
नेरळ ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर व्हावे यासाठी अनेक वर्षे मागणी केली जात आहे. मात्र सध्याचं नेरळ ग्रामपंचायती मधील 100 कामगारांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत,अशी स्थिती ग्रामपंचायतीची झाली आहे. मागील पाच महिन्यांचे पगार थकले असून नाव मोठे लक्षण खोटे असे नेरळ ग्रामपंचायती बद्दल बोलले जाऊ लागले आहे.
03 Mar 2025 12:25 PM (IST)
विधीमंडळाचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली आहे. विरोधक हे अजित पवार गटाचे नेते व मंत्री अजित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यामध्ये भेट झाली असून चर्चा झाली आहे.
03 Mar 2025 12:21 PM (IST)
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. अभिभाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सोडवण्यासाठी आमचे सरकार पूर्णतः बांधील आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय, सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
03 Mar 2025 12:19 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकार्यकर्त्यांनी परिवर्तन आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ शहराचे अध्यक्ष राहिलेले धनाजी गरुड यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
03 Mar 2025 12:08 PM (IST)
मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये स्मार्टफोन कंपनी HMD ने HMD Fusion X1, HMD Barca 3210, HMD Amped Buds आणि HMD 2660 Flip फोन लाँच केले आहेत. कंपनीने या अद्याप या डिव्हाईसची किंमत उघड केली नाही. मात्र त्यांचे स्पेसिफिकेशन्स जाहीर करण्यात आले आहेत. HMD Barca 3210 फोन बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या Blau आणि Grana च्या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. HMD म्हणते की त्यांनी विशेषतः किशोरवयीन यूजर्ससाठी X1 स्मार्टफोन लाँच केला आहे.
03 Mar 2025 11:38 AM (IST)
वेंगुर्ल्यातील श्री देवी सातेरी मंदिरात 3ते 5मार्च दरम्यान भक्तिमय किरणोत्सव सोहळा होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडण्याचा हा अलौकिक क्षण अनुभवण्यासाठी अनेक भक्तांनी उपस्थिती लावली. सुमारे 500 वर्षे जुन्या आणि संपूर्ण जांभ्या दगडात उभारलेल्या या भव्य मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशिल्पही विशेष आकर्षण ठरले.
03 Mar 2025 11:35 AM (IST)
माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेक चे संवर्धन उपक्रमाला सुरुवात झाली आहे. पाच कोटी खर्च करुन शार्लोट लेक संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कामामध्ये तलावातील गाळ काढण्यात येत आहे.त्यावेळी काढण्यात आलेली गाळमिश्रित माती ही शहरातील उद्यानासाठी वापरण्यात यावी अशी मागणी माथेरान मधील स्थानिकांनी केली आहे.
03 Mar 2025 11:32 AM (IST)
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या यात्रेदरम्यान झालेल्या छेडछाडीच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा तसेच वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत झालेली वाढ या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आजपासून (3 मार्च) सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारला विरोधकांकडून जोरदार टिकेला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एका पुस्तिकेद्वारे 11 प्रमुख घोटाळ्यांची माहिती सादर करत सरकारला अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.
03 Mar 2025 11:30 AM (IST)
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बेंडसे आणि वावे या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दर पावसाळ्यात पुराची पाणी जात असतं. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्यानंतर पुलावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले आहेत.त्या लोखंडी रेलिंग बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, बांधकाम विभाग बेडसे वावे पुलाला लोखंडी रेलिंग बसवून घेणार आहे कि नाही? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहे.
03 Mar 2025 10:55 AM (IST)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधीमंडळच्या आवारामध्ये विरोधी नेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तर सत्ताधारी नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर फोटोशूट केले आहे.
03 Mar 2025 10:53 AM (IST)
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार आले आहे. सरकार सत्तेत येऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. मात्र विरोधी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे विधीमंडळाचे पहिलेच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेना ठाकरे गटाला ते मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा होत आहे.
03 Mar 2025 10:52 AM (IST)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली आहे. सर्व सत्ताधारी आणि विरोधी नेते विधीमंडळामध्ये दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांनी विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
03 Mar 2025 10:42 AM (IST)
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातामध्ये बेड्या घालून विधीमंडळामध्ये प्रवेश केला आहे. राज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. आम्हाला व्यक्त करु दिलं जात नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. अमेरिकेतील भारतीयांना हाल करुन असे साखळदंड बांधून आणले. यामध्ये मराठी माणसं देखील होती, या घटनेचा निषेध म्हणून बेड्या घालून विधीमंडळामध्ये आले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.