(Photo - X)
Devendra Fadnavis : मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सिद्धार्थ उद्यान येथे आयोजीत या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आमदार सतिष चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार सुहास शिरसाट, विधानसभा सदस्य आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार विलास भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटूंबिय, शासकीय अधिकारी- कर्मचारी, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी शहीद स्मारकास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्र्ध्वजारोहण करुन राष्ट्र्ध्वजास मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणाच्या प्रारंभी त्यांण छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित केली.
ते म्हणाले की, अनेकांच्या बलिदानामुळेच खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्त झाला आहे. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, ह्यांनी एक प्रचंड मोठी लढाई उभारली त्यातून आपला मराठवाडा मुक्त झाला. त्यावेळी अत्याचाराची परिसिमा झाली होती.अशा प्रकारच्या अवस्थेतून या मराठवाड्याला बाहेर काढण्याचं काम हे आपल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी केलं त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले की, मराठवाडा सातत्याने संघर्ष करतोय. विकासाचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. दुष्काळाचं संकट हे सातत्याने घोंगावताना दिसतं. यंदाचे वर्ष देखील दुष्काळाचं वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं, पिकांचं नुकसान झालं. आमचा शेतकरी चिंतेत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत आपण देऊ. पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबर नंतर पूर्ण करुन आम्ही शेतकऱ्यांना मदत करु. पिण्याचे पाणी, चारा अशी सगळी व्यवस्था आणि नियोजन केलं आहे.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आपल्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलाय.आतापर्यंत १५ लाखांच्या वर शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहेच शिवाय आता जवळपास ४८ हजार कोटी रुपयांची, जुनी वीज बिल रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या दुष्काळीस्थितीबाबत ते म्हणाले की, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला; पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प आम्ही केला आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगाने वाटचाल सुरु आहे. कृष्णा खोऱ्यातलं पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणायचं काम आता सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल.तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. अंदाज असा आहे की, जवळपास ७० टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून हे गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल.टप्प्याटप्प्यानं; सात वर्षात हे काम पुर्ण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.
सूखे की संभावित स्थिति में राज्य सरकार पूरी ताकत के साथ किसानों के साथ खड़ी है। (छत्रपती संभाजीनगर | 17-9-2026)#Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar pic.twitter.com/SlLJfvariM — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2026
शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. निधीची कमतरता पडू दिली नाही. वेगाने काम चाललेलं आहे. अडचणी आपण दूर करतो आहोत. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी येईल. त्याकडे आपली वाटचाल ही सुरू झाली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर मध्ये पश्चिम उन्नत द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गामुळे शेंद्रा-बिडकीनसारख्या औद्योगिक वसाहती, डीएमआयसीसारखं क्लस्टर आता देशातलं प्रमुख क्लस्टर झालंय. या ठिकाणी टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर या सारख्या कंपन्यांमुळे पुढच्या काळात देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंग करणारं क्लस्टर हे छत्रपती संभाजीनगरचं क्लस्टर असणार आहे आणि एक वेगळा सन्मान मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योग विस्ताराबाबत फडणवीस म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येतेय आणि या गुंतवणुकीला अनुरूप आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरदेखील तयार करतो आहोत. अजून ८,००० एकर जागा त्या ठिकाणी अधिग्रहित करून आपली औद्योगिक वसाहत आपण मोठी करत आहोत. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे आपल्याकडे रोजगाराची निर्मिती होतेय आणि या रोजगारातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न मराठवाड्यात होत आहे,असे त्यांनी सांगितले.
उद्योगाच्या परिसंस्था विकासासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत ते म्हणाले की, जालना ड्रायपोर्टचं काम आता सुरू झालंय. आपल्याकडे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या आवश्यक आयात निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टवरुन करण्यात आली आहे. तसेच संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही आपल्याला चांगला वाव आहे. त्यासाठी आपण शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करतोय. त्याकरता साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातला सगळ्यात लांब उन्नत रस्ता आपण तयार करतो त्यामुळे कुठलाही ट्रॅफिक जॅम पुढच्या काळामध्ये होणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधांच्या विकासाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७१० कोटी रुपयांच्या नवीन इमारतीची उभारणी, धाराशिवमध्ये राज्यातल्या एक ५०० खाटांचे अद्यावत रुग्णालय, मेडिकल कॉलेज असेल, किंवा परळीमध्ये ५६५ कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधांच्या विकासाचे काम आपण सुरु केले आहे,असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, मराठवाडा हा आकांक्षी प्रदेश आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा प्रदेश आहे.सगळ्यांना सोबत घेऊन मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे आणि परिवर्तित करण्याचे कार्य आपण सुरू केले आहे. समाजातल्या सर्व घटकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनआणण्याचा प्रयत्न सुरु आहे,असे त्यांनी आश्वस्त केले.






