कळमनुरी बायपासजवळ भर रस्त्यातच 'बर्निंग टेम्पो'चा थरार; प्लायवूडसह टेम्पो जळून खाक (File Photo : Fire)
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एमआयडीसीमधील एका ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 11 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जेव्हा या ठिकाणी स्फोट झाला, तेव्हा कंपनीत 150 कामगार काम करत होते. सुदैवाने हे कामगार यातून बचावले आहेत.
नागपुरातील कंपनीमध्ये ॲल्युमिनियम पावडर असल्याने आग विझवताना अडचणी येत होत्या. यामध्ये पावडर जळून खाक झाल्यानंतरच संपूर्ण आग आटोक्यात येईल, असे म्हटले जात होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांकडून देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यातील जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे.
स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण
स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
150 जण थोडक्यात बचावले
ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत एकूण 150 कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे 150 कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान, कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले होते. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले.
अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न
सायंकाळी सहाच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये 11 कामगार गंभीर जखमी झाले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर नागपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.