हलगर्जीपणामुळे ग्राम महसूल अधिकारी निलंबित बाळासाहेब वनवे यांच्यावर कारवाईचा बडगा (फोटो - सोशल मीडिया)
कदमवाकवस्ती : कर्तव्य बजावताना गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब श्रीपती वनवे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. प्रशासनाच्या कामकाजात झालेल्या गंभीर त्रुटींमुळे करण्यात आलेल्या या 13613 कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांनी सादर केलेल्या अहवालानंतर हा प्रकार उघडकीस आला.
संबंधित अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी कर्तव्यात अक्षम्य आणि गंभीर हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अंतर्गत अधिकारांचा वापर करून त्यांना तत्काळ निलंबित केले. तसेच त्यांच्या विरोधात नियम ८ नुसार शिस्तभंगाची विभागीय कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : एकीकडे गॅससाठी वणवण तर दुसरीकडे काळाबाजार फोफावला; एकाच घरातून 31 सिलेंडर जप्त
मुख्यालय सोडण्यास अधिकाऱ्यांना मनाई
निलंबन आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत वनवे निलंबित राहणार असून त्यांच्या निलंबन कालावधीत मुख्यालय तहसील कार्यालय, जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच निलंबनाच्या काळात कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये, असे स्पष्ट निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत. दरम्यान, लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाला वनवे यांच्या दप्तराची सखोल तपासणी करून नियम ८ नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे देखील जागा : गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय
रामदरा डोंगर वणव्याने होरपळला
लोणी काळभोर परिसरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा येथील वनविभागाच्या हद्दीतील डोंगराला काल भीषण वणवा लागला. या आगीत परिसरातील लाखो झाडे जळून खाक झाली असून, असंख्य वन्यजीवांचा होरपळल्याने मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर घटनेनंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय दुर्लक्षाचा तीव्र आरोप केला आहे. काल दुपारच्या सुमारास डोंगराच्या एका भागात अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच या आगीने संपूर्ण डोंगर कवेत घेतला. घटनेची माहिती मिळताच ‘ग्रीन फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते तातडीने मदतीला धावले. कार्यकर्त्यांनी झाडांच्या फांद्या आणि गोणपाटाच्या सहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची भीषणता आणि डोंगराळ भागातील वाऱ्यामुळे हे प्रयत्न अपुरे ठरले.






