पुण्यातील नाना पेठे लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काल (दि.06) आगीची भीषण घटना घडली. शहरातील नाना पेठेमध्ये राम मंदिराशेजारील वाड्याला आग लागल्याची घटना घडली. जुन्या पद्धतीचा वाडा असल्यामुळे आगीचा भडका उडाला होता. लाकडी वाडा असल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. रामनवमी असल्यामुळे मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी होती. पुण्यातील अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
रात्री 08:08 वाजता नाना पेठेतील राम मंदिराजवळ ही आग लागली. पारेख वाडा असे या आग लागलेल्या वाड्याचे नाव होते. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली. संपूर्ण धगधगता वाडा पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्याच्या तिन्ही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी केली. वाड्याच्या तिन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच वाड्यात कोणी राहत नसल्याची आणि कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. तसेच आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याची खातरजमा केली. आगीचे लोट मोठे असल्यामुळे धूर देखील मोठ्या प्रमाणात होता. यामुळे शेजारी असलेल्या रहिवासी इमारती मधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले. घरामधील सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका टाळला व आग इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली. सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदर ठिकाणी पुर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद व काम सुरु असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी व किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन करत आहेत. या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही. मात्र पुणे शहरात अशा पद्धतीने जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. तसेच पडलेले आणि मोडकळीला आलेल्या जुन्या लाकडी वाड्यांचा प्रश्न आणि त्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.