अवकाळी पावसाचा माथेरानला फटका ! शहरातील वीज पुरवठा तीन दिवसांपासून खंडित
माथेरान/संतोष पेरणे: माथेरान शहर आणि कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. या अवकाळी पावसाने माथेरान शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. माथेरान शहरात गेल्या तीन दिवस वीज पुरवठा खंडित होत असून त्याचा परिणाम शहरात पाणी पुरवठ्यावर झाला आहे. दरम्यान,पर्यटनाचा सिझन लक्षात घेवून महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करणारे निवेदन देण्यात येत आहेत.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान शहरात पर्यटक थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. मात्र याच काळात सोमवार पासून वादळी वारा आणि सोबतीला अवकाळी पाऊस सुरू आहे.या वादळी वाऱ्याने विजेच्या तारांवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम माथेरान शहरात सोमवार सायंकाळ पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. माथेरान शहरात वीज पुरवठा स्तात्याने खंडित होत असल्याने शहराला पाणी पुरवठा होणे बंद झाले आहे. त्याचा थेट परिणाम पर्यटनावर होत असून पाणी उपलब्ध नसेल तर हॉटेलमध्ये पर्यटकांना कसे थांबवून घ्यायचे? असे अनेक प्रश्न घरगुती लॉजिंग व्यवसाय करण्याऱ्यांसमोर निर्माण झाले आहेत.
अवकाळी पावसाने शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान, आपत्तीग्रस्त लोकं मदतीच्या प्रतिक्षेत
नेरळ येथून होणारा पाणीपुरवठा हा माथेरान मध्ये येणारी वीज नेरळ माथेरान घाटात लोप पावत असल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद झाला आहे.पाण्याचे वितरण बंद झाल्याने स्थानिकांवर पाण्याचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे.
उन्हाळी पर्यटन हंगाम लक्षात घेवून महावितरण कंपनीने वीज पुरवठ्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी आता माथेरान मधील स्थानिक सामाजिक संघटना करू लागल्या आहेत. शहरात जूनचे मध्यापर्यंत पर्यटक येणार असे गृहीत धरल्यास शहरात पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास पर्यटन हंगाम चांगला जाणार आहे. त्यामुळे व्यापारी फेडरेशन तसेच माथेरान स्थानिक लॉजिंग व्यवसाय संघटना आणि माथेरान क्षत्रीय मराठा समाज यांनी पत्रव्यवहार करून महावितरणने आगामी काळात कोणत्याही प्रकारचे शट डाऊन घेऊ नये अशी सूचना केली आहे. तसेच जून महिन्यापर्यंत महावितरणची वीज सर्वांना मुबलक आणि अखंडित मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असे आपल्या निवेदनात नमूद केले आहे. माथेरान व्यापारी फेडरेशन कडून अध्यक्ष राकेश चौधरी तर माथेरान स्थानिक लॉजिंग व्यवसाय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप जाधव आणि माथेरान क्षत्रीय मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी महावितरणला केली आहे.
आमच्या कडून शहरात अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असून नेरळ माथेरान घाट रस्त्यातील झाडे कोसळण्याची समस्या आमच्या साठी सर्वात मोठी प्रश्नचिन्ह असून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमचे 100 टक्के प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महावितरण माथेरान शाखेचे सहायक अभियंता सचिन आटपाडकर यांनी दिली