संग्रहित फोटो
पाटस : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गावर अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनेची आवश्यकता असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चादेखील केली आहे.
बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते ओलंडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा टायर फुटल्याने काही वाहने दुभाजकावरून दुसऱ्या लाइनमध्ये शिरत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. हे प्रकार थंबवण्यासाठी दुभाजकांची उंची वाढवण्याबरोबरच अन्य अनेक सुधारणा करण्याची मागणी खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याबाबत स्थानिक नागरिक आणि व प्रवाशांच्याकडून करण्यात आलेल्या मागण्या खासदार सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.