पुणे : राज्यसभेच्या रिक्त होणार्या जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीकरता भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. यामुळे पुढील काळात शहर भाजपमधील अंतर्गत राजकारण रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या महिन्याअखेर राज्यसभेच्या रिक्त जागांची निवडणूक हाेणार आहे. माजी आमदार प्रा. कुलकर्णी यांनी मंगळवारी महापालिकेकडे ‘नो ड्यूज’ सर्टीफिकेटसाठी अर्ज केल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली हाेती. बुधवारी पक्षाकडून त्यांची उमेदवारी अधिकृत जाहीर केली गेली. कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यामुळे आगामी लोकसभेच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार गिरीश बापट यांचे मागील वर्षी निधन झाले. परंतू साधारण वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाही पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक झालेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधीत्व राखण्यासाठी…
भाजपने आतापर्यंत पुणे लोकसभा, राज्यसभा अथवा विधानसभा, विधान परिषदेमध्ये ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघाच्या आमदार प्रा. कुलकर्णी यांचा पत्ता कट करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी दिली. तर कसबा मतदारसंघामध्ये तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. दुर्देवाने टिळक यांचेही निधन झाले. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार असतानाही कॉंंग्रेसने भाजपचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर ‘ब्राम्हण’ समाजाचे प्रतिनिधीत्व राखण्यासाठी भाजपकडून प्रा. कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली आहे.
याच मतदारसंघातून प्रकाश जावडेकर यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली हाेती. त्यांना डावलून आता पक्षाने प्रा. कुलकर्णी यांना कामाची संधी दिली आहे. प्रा. कुलकर्णी यांना काेथरुड विधानसभा मतदारसंघातून डावलत भाजपने चंद्रकांत पाटील यांना संधी दिली हाेती. त्यानंतर प्रा. कुलकर्णी या पक्षीय राजकारणात फार सक्रिय नव्हत्या.
दाेन वर्षांपासून पक्षात सक्रिय
गेल्या दाेन वर्षांपासून त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या हाेत्या. त्यांच्याकडे सध्या भाजप महिला माेर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी आहे. त्यांना संधी मिळाल्यानंतर शहर भाजपमधील राजकारणाला रंग चढणार आहे. प्रा. कुलकर्णी यांच्याबाबत पक्षातील विराेधक काय भूमिका घेणार ? तसेच प्रा. कुलकर्णी विराेधकांशी जुळवून घेणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
[blockquote content=”‘‘ खुप आनंद, समाधान वाटते, पक्षाने विश्वास माझ्यावर दाखविला. पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल वरीष्ठ नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरीष्ठ नेत्यांचे, मला राज्यसभेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानते.’’” pic=”” name=”- प्रा. मेधा कुलकर्णी”]