सिंधुदुर्ग : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानअंतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या स्मरण प्रीत्यर्थ ‘अमृत वाटीके’ची निर्मिती केली जाणार आहे. या अमृत कलश यात्रेची सांगता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या अभियानाच्या अनुषंगाने आज नगर विकास विभाग, सिंधुदुर्ग मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड-जामसंडे, कुडाळ, कसई – दोडामार्ग व वाभवे-वैभववाडी या आठही नागरी भागातील मातीने भरलेल्या अमृत कलशांची सिंधुदुर्ग येथे ढोलताशांच्या गजरात उत्सवी वातावरणात अमृत कलश यात्रा संपन्न झाली.