मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सुरुंग लागला. शिवसेनेतील बंडाळीमुळे ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की घडतय काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
दहा दिवसांच्या सत्ता संघर्षात शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. भाजपने शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली. सोमवारी शिंदे सरकारने विश्वास दर्शक ठराव बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत गेल्या दहा दिवसांमधील राजकीय घडामोडी कथन केल्या. पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करायला हवे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत असताना विधानसभेत प्रेक्षक गॅलरीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात दीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या आवारातही श्रीकांत शिंदे आणि मिलिंद नार्वेकर एकत्र वावरताना दिसले. यामुळे अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत.