मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्यानं आणि पोटाच्या समस्येमुळं मलिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्री नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, ईडीनं अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिकांनी मागितलेला वैद्यकीय जामीन म्हणजे, कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.
[read_also content=”राजस्थानच्या जोधपूरमध्ये लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद https://www.navarashtra.com/india/stone-throwing-in-two-groups-over-loudspeakers-in-jodhpur-rajasthan-internet-service-closed-indefinitely-nrps-275576.html”]
सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मलिक कारागृहात नसून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी अटकेत असलेले मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर आहे.