महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.
जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. बैठकीस बंदरे मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, बंदरे विभागाचे उपसचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.
अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले, जेट्टीचे काम पुढील १० दिवस थांबविण्यात यावे. याबाबत स्थानिकांच्या आणखी एका बैठकीचे आयोजनही करण्यात येऊन यामधून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. जेट्टीसाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रकल्पाबाबत पडताळणी करावी. जेट्टीबाबत करण्यात आलेल्या विविध अभ्यासांचे अहवाल स्थानिक नागरिकांना देण्यात यावे. या अहवालांवरती त्यांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास त्याचीही पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
चर्चेवेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे मुंबईहून अलिबाग, मांडवा, जेएनपीटी व एलिफंटा येथे जाण्यासाठी जलवाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधांवर मर्यादा येत असल्यामुळे प्रवाशांसाठी अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
Nitesh Rane: पालकमंत्री नितेश राणे यांचा जनतेशी थेट संवाद; म्हणाले, “नागरिकांच्या अडचणी…”
एवढा मोठा प्रकल्प होत असल्यास स्थानिकांच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असते. शासन जेट्टीचा प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. प्रकल्पामुळे स्थानिकांची गैरसोय होत असल्यास किंवा मुंबईच्या हेरीटेजला धक्का बसेल, असे कुठलेही कार्य शासन करणार नाही. या जेट्टीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. मच्छीमारांच्या समस्यांचाही शासन गांभीर्याने विचार करेल. या प्रकल्पाबाबत करण्यात आलेले विविध अभ्यास अहवाल स्थानिकांना त्यांच्या परीक्षणासाठी देण्यात येतील. जबरदस्तीने हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, याबाबत मंत्री राणे यांनी स्थानिकांना आश्वासित केले.
नितेश राणे यांचा जनतेशी थेट संवाद
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा ते ‘पालकमंत्री कक्षा’त जनतेसाठी उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’त जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास मदत झाली.