कल्याण : वीज बिलाचा भार कमी करत पर्यावरण पूरक स्त्रोतापासून वीज निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा पुरस्कार करताना डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायटयांना सोलर एनर्जी पॉवरची भेट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. पॉवर एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्याच्या मदतीने शहरातील गृहनिर्माण सोसायटयांना सोलर एनर्जी पॉवर सिस्टीम मोफत दिले जाणार असून याबाबतची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शहरातील ५०० पेक्षा जास्त सोसायट्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक विजेचा स्त्रोत असलेल्या सोलार एनर्जी सिस्टीम नव्या इमारतीना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीसुद्धा जुन्या इमारतीवर मात्र अशाप्रकारची सोलार प्रणाली नाही. शहरात अशा हजारो इमारती असून या इमारतींना लिफ्ट, पथदिवे, सामूहिक विजपुरवठा, पाण्याचा पंप यासाठी लागणाऱ्या विजेसाठी दरमहा ५० ते ६० हजार रुपयाचे बिल भरावे लागते. या इमारतीची या वीज खर्चातून सुटका करता यावी किंवा किमान वीज बिल निम्म्यापर्यत कमी करता यावे यासाठी शहरातील अशा सर्व इमारतीवर सोलर प्रणाली कार्यान्वित करत केंद्र सरकारचा सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून डोंबिवली शहर पहिली ग्रीन सिटी करण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
इमारतीवर सोलर प्रणाली बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने सोसायटयांना हा खर्च परवडत नाही. यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच्या माध्यमातून सोसायटयांना ही प्रणाली मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ही प्रणाली आपल्या सोसायट्यासाठी कार्यान्वित करून घेत वीज बिलाच्या रकमेतून जास्तीत जास्त सूट मिळवा त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून विजेची बचत करत सौर उर्जा वापरण्यासाठीच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवा असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीनंतर उपस्थित गृहसंकुलापैकी जवळपास ७० गृहसंकुलांनी ही प्रणाली बसविण्यासाठी आपण तयार असल्याचे समती पत्र दिले असून उर्वरित सोसायट्याशी संपर्क साधून हा उपक्रम त्यांच्यासाठी कसा फायद्याचा ठरेल याबाबत त्याना कंपन्याच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून पटवून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.