Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात पावसाने जोर धरताच धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत शहरातील विविध भागांत सुमारे २० झाडे रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी एका गंभीर अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये काही झाडे महापालिकेच्या स्थापनेपूर्वीची असून काही खासगी मालकीची आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती हटविणे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे ही महापालिकेची जबाबदारी असते. यासाठी प्रशासनाकडून उद्यान विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातात.
मात्र, यंदा झाडांच्या सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच शहरात सलग झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बहुतांश झाडे नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागात कोसळल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कोसळलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र शहरात अजूनही अनेक धोकादायक झाडे उभी असून ती केव्हा कोसळतील याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संपूर्ण शहरातील झाडांचे नव्याने सर्वेक्षण करून धोकादायक झाडांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, भाईंदर पश्चिम येथील राई गाव परिसरात बुधवारी सायंकाळी खासगी मालकीच्या नारळाच्या झाडाचा बुंधा अचानक कोसळून तो रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळा अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे कोसळत असल्याने आगामी काळात अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने तातडीने धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी किंवा हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






