सातारा : महालक्ष्मी पतसंस्था पेंडसेनगर येथील पतसंस्थेच्या संचालक व व्यवस्थापक यांनी सभासदांच्या बोगस वार्षिक सर्वसाधारण सभा दाखवून खोट्या स्वाक्षरीद्वारे लाखो रुपयांचा अपहार केला. हा पैसा सर्वसामान्य सभासदांचा होता. या आर्थिक फसवणुकीसंदर्भात आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी पतसंस्थेचे सभासद रामचंद्र जाधव, रमेश इंदलकर, संजय इंगळे, शेखर इंगवले, ज्ञानेश्वर येडे, वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पतसंस्थेचे सभासद रामचंद्र जाधव पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, सर्व अर्जदार हे शाहूपुरी परिसरातील आहेत. महालक्ष्मी पतसंस्था पेंडसेनगर या संस्थेच्या सभासदांनी आपल्या ठेवी पिग्मीद्वारे ठेव म्हणून या संस्थेमध्ये ठेवल्या होत्या. संस्थेचे संचालक तसेच व्यवस्थापकांनी परस्पर संस्थेच्या सर्वसाधारण सभा बोगस पद्धतीच्या केल्या असून, संस्थापक व संचालकांनी लाखो रुपयांचा गैरवापर यामध्ये केला आहे. लेखापरीक्षण अहवालामध्ये संस्थेची वस्तूस्थिती लपवून संस्था तोट्यात असताना सुद्धा ती नफ्यात आहे, अशी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली.
संस्थेच्या स्व मालकीची इमारत आणि त्याला लागून असलेली रिकामी जागा तसेच संस्थेने बांधलेले शेड सभासदांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर विकण्यात आले. संस्थेच्या मालकीच्या ही जागा साडेतीन कोटी रुपयांची असताना 88 लाख रुपयांमध्ये परस्पर विकून खातेदाराने नातेवाईकांनी पैसे बेकायदेशीरपणे काढून घेतले आहे. जागा विक्रीची जाहीर लिलावाची नोटीस लावणे गरजेचे असताना सभासदांना अंधारात ठेवण्यात आले. संस्था तोट्यात गेल्याबाबतची माहिती दिल्याशिवाय व संस्थेवर प्रशासक नेमल्याशिवाय परस्पर विक्री करता येत नाही. व्यवस्थापक आणि मॅनेजर यांनी सदरची प्रॉपर्टी कमी किमतीत विकून स्वतःचा फायदा केलेला आहे
सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक नुकसानीला संचालक मंडळ, व्यवस्थापक जबाबदार आहे. महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात आमची तक्रार असून, याबाबत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.