अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसला (Rashtrawadi Congress) सत्तेत सोबत घेताना त्याविषयी मंथन आणि चिंतन होण्याची गरज होती. विचारात व विश्वासात न घेता (NCP) राष्ट्रवादीला सोबत घेण्यात आलं आहे,असा दावा शिंदे गटासोबतचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत भाजप व शिवसेनेला पाठींबा दिला. यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर अन्य आठ आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांची चांगलीच गोची झाली आहे. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांची गोची झाली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हती. शिवसेनेचे (Shivsena) मतदार संघ फोडून त्यांच्या मतदार संघाची बांधणी होत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर आता अशी कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचे आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काहीपण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे; अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.