मुंबई : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना-भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले होते. सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत हे आगलावे आहेत. ते टेंभा घेऊन महाराष्ट्रात आग लावत फिरतात’, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
कोल्हापुरातील एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांनी राज्यातील विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं. त्यात आता शहाजीबापू पाटील यांनी म्हटले की, ‘संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका’.
संजय राऊत-सुनील राऊतांना म्हणाले काळू बाळू
संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्याबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही बंधूंचा उल्लेख काळूबाळू असा केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘एकाच आई-बापाची दोन पोरं सारखीच असतात. ते काळू बाळू आहेत.’
काय म्हणाले संजय राऊत?
विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचा मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे यांनी दिली ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पद गेली तर पदं परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. या विधानाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर विधान परिषदेतही या विधानाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला.