मेढा : प्रस्तावित विकास आराखड्याला वरीष्ठ पातळीवरून स्थगिती घेणार असून शेतकरी, ग्रामस्थ यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. दरम्यान शेतकरी, ग्रामस्थ व्यथा मांडत असताना माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.
प्रस्तावित विकास आराखड्याच्या विरोधात बाधीत शेतकरी ग्रामस्थ यांनी दोन दिवसा पूर्वीच बोंबाबोंब आंदोलनही केले होते. प्रस्तावित आराखड्याच्या विषयावर विचारविनमिय करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात बाधित शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांची बैठक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात अाली हाेती. या प्रसंगी जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ, मुख्याधिकारी अमोल पवार, शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींना केराच्या टोपल्या दाखवल्या जातात, अशी नागरिकांची तक्रार अाहे.
शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषा
प्रस्तावित विकास आराखडा, वाढीव करवाढ, प्रलंबित असणाऱ्या इमारतीच्या नोंदी व अन्य प्रश्न असताना मात्र त्या बाबत चर्चा होणे गरजेचे असताना बैठक गुंडाळण्यात आली. ज्यांच्या काळात करवाढ व प्रस्तावित विकास आराखडा यांचा अभ्यास न करता ठराव झाला. तेच माजी अध्यक्ष व नगरसेवक बैठकित याबाबत आम्हाला कल्पना नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरत होते.
जनतेचा पैसा पदािधकाऱ्यांच्या खिशात
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहाण्याची गरज आहे. ज्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवले त्यांनी नगरपंचायतीमध्ये काय घोळ घालून ठेवले आहेत.? विकास कामासाठी पैसा दिला, पण तो पैसा जनतेसाठी होता कि पदाधिकाऱ्याचे खिसे भरण्यासाठी होता? संबधित अधिकाऱ्यांनाही कामाची गुणवत्ता तपासण्याची गरज वाटली नाही, याची चर्चा नागरिकांत सुरु आहे. पाच वर्षात एकही ठोस विकास काम न झाल्यामुळे नागरिकांत असतोष आहे.
शेतकरी बचावकडून माजी नगराध्यक्षांचा निषेध
बैठकीत चर्चा चालू असताना काही नगरसेवक मोठया आवाजात ओरडून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर विलास जवळ शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत असताना माजी नगराध्यक्ष यांनी त्यांना अर्वाच्च भाषा वापरून सर्वांच्या समोर शिवीगाळ केली. या घटनेचा शेतकरी बचाव संघाने तीव्र निषेध केला. माजी नगराध्यक्षांनी जाहीर माफी माघीतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.