राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका (फोटो- ट्विटर)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राज्यात आता प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नेत्यांचा भाषणाला धार आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दिवसाला अनेक सभा पार पडत आहेत. त्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मोठ्या ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारीसाठी दिंडोशी येथे सभा घेतली. यावेळेस त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
आजच्या प्रचारसभेत राज ठाकरे म्हणाले, “अनेक नेत्यांकडे कित्येक हजारो एकर जमिनी आहेत. ज्या प्रश्नांसाठी तुम्ही त्यांना मतदान करत असता, तेच प्रश्न नेमके त्यांना कळत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारांचा अपमान झाला आहे. करोना काळात ऑक्सीजन मिळत नव्हता. झालेल्या गोष्टी आपण विसरून जातो. राजकारणी लोकांनी काय माती केली आहे हे मतदार विसरून जातात. ”
पुढे बोलताना राज ठाकरे, “ज्यांच्याविरोधात लढण्यात हयात गेली ती शिवसेना कॉँग्रेससोबत सत्तेत जाऊन बसली. आज बाळसाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटले असते? शिवसेनेचे दुकान उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेसच्या बाजूला थाटले. स्वतच्या फायद्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरले. मुख्यमंत्रीपदासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. माझी मुंबई आणि महाराष्ट्रसाठी काही स्वप्न आहेत. आज घरी गेल्यावर राज ठाकरे asthetic असे यूट्यूबवर सर्च करा. म्हणजे तुम्हाला माझे व्हीजन कळेल.”
राजकारण भलतीकडेच सुरू- राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोरात प्रचार सुरू केला आहे. मशिदींवरील भोंग्यावरून त्यांनी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. दरम्यान आजही ते मशिदीच्या भोंग्यावरून आक्रमक झालेले पहायला मिळाले. राज्यात सत्ता आली तर मशिदींवरू भोंगे बंद करू, असं म्हणत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानी नाहीतर देशाचं नाक आहे. इंग्रज मुंबईत आले तेव्हा त्यांनी मुंबई कशी वसली होती? मात्र शहराचा अख्खा विचका झाला आहे. मला इथं यायला दीड तास लागला आहे. शहरात किती माणसे येत आहे. रस्ते कमी पडत आहेत. शहराचा विकास करताना काय हवं काय नको याची जबाबदारी जशी नगरसेवकाची तशी ती आमदाराचीही. पण या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी याचं राजकारण कामी लावत नाहीत तर याचं राजकारण भलतीकडेच सुरू असतं, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
हेही वाचा: Raj Thackeray : ‘…तर मशिदींवरील भोंगे बंद करू’ ; घाटकोपरमधील सभेतून राज ठाकरे कडाडले
‘पत्रकार मला कुत्सितपणे सारखं ब्लू प्रिंटचं काय झालं ते विचारायचे, पण ब्लू प्रिंट आणली. तेव्हा कोणी विचारायला आलं नाही. कारण कोणी वाचलीच नाही. आंदोलनामुळं टोलनाके बंद झाले. ते पैशांचं मशीन होतं. मात्र ते बंद झाल्यानंतर आम्हाला श्रेय दिलं जात नाही. दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांचं आंदोलन तसंच होतं. दुकानावरच्या पाट्या मराठी झाल्या. मोबाईल फोनवर मराठी भाषा यायला लागली.’






