कल्याण : राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल होत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावेळी कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पावसाळ्यात कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दोन घरे कोसळली. ही कोसळलेली घरे अन्या चार घरावर पडली आहेत. त्यामुळे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली. ही कुटुंबे गरीब असल्याने घर पुन्हा कसे उभारायचे असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मनसे आमदार राजू पाटील यांनी सहा नागरीकांना घर बांधण्याकरीता आर्थिक मदत दिल्याने नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंद परिसरातील टेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना स्थलांतरीत करण्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी कचोरे येथील टेकडीचा भाग खचला होता. त्याठिकाणी असलेला एक भला मोठा दगड खाली कोसळला हाेता. त्यानंतर काल दुपारी नेतिवली टेकडीवरील अनंत पवार यांच्या घराचा भाग कोसळला.
त्यांच्या घराचा भाग अन्य घरांवर कोसळल्याने सहा घरांचे नुकसान झाले होते. या घटनेची गंभीर दखल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घेतली. ज्या घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये सुरेश चव्हाण, अनंत पवार, हरीलाल भारद्वाज, काशीराम मालुसरे, दत्तात्रय पांचाळ, सुरेश भोसले यांच्या घरांचे नुकसान झाल्याने या सहा जणांना घर बांधण्याकरीता मनसे आमदार पाटील यांनी आर्थिक मदत दिली आहे. मनसेचे पदाधिकारी महेंद्र कुंदे यांनी या सहा कुटुंबियांना मदत पोहचविली आहे. घरासाठी मदत मिळाल्याने नागरीकांनी आभार मानले आहेत.