पुण्यातील 'या' ठिकाणी होणार 'मॉकड्रील'; 'ब्लॅकआउट' होणार का? तर प्रशासनाने म्हटलं... (फोटो सौजन्य-X)
पुणे : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीन ताणले गेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बुधवारी (दि.७) सायंकाळी चार वाजता पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, हे मॉकड्रील केवळ खबरदारीचा उपाय म्हणून होत असून, यावेळी जे भोंगे वाजतील त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कारवाईचे मोठे संकेत दिले आहेत. सध्या भारत पाकिस्तान युद्धाची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशात २४४ ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून किंबहुना युद्ध झाल्यास काय खबरदारी घ्यावी यासाठी हे मॉकड्रील केले जात आहे. केंद्र शासनाच्याच्या सूचनेनुसार, आज राज्य शासनाने या मॉकड्रीलच्या तयारीसाठी बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात पुणे, ठाणे, रत्नागिरी, मुंबई व सिंधुदुर्ग येथे मॉकड्रिल घेण्याचे निश्चित करण्यात आले.
हेदेखील वाचा : देशातील 244 ठिकाणी आज ‘मॉक ड्रिल’; जाणून घ्या नेमकं काय-काय होणार?
पुणे शहरात विधान भवन येथे व जिल्ह्यात तळेगाव नगरपरिषद व मुळशी पंचायत समिती येथे सायंकाळी चार वाजता हे मॉकड्रील होईल. यामध्ये लष्कर, पोलीस, एअर फोर्स, अग्निशामक दल, आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आदी यंत्रणा सहभागी होणार आहेत.
देशात कुठेही लष्करी हल्ला झाला तर…
युद्ध झाल्यास जर देशात कुठेही लष्करी हल्ला झाला तर, कमीत कमी कालावधीत मदतकार्य कसे पोहोचवता येईल व उद्भवलेल्या आपत्तीमध्ये सर्वसामान्यांना कसे संकटमुक्त करता येईल यासाठी हे मॉकड्रील होत आहे. या मॉकड्रीलमध्ये केवळ मदतकार्य व काय खबरदारी घ्यावी याबाबत सराव होणार आहे. युद्धाच्या वेळी अनेकदा मोठ्या शहरामधील महत्वाच्या इमारती व शासकीय कार्यालये लक्ष होतात. त्यामुळे मॉकड्रीलसाठी शहरातील विधानभवन निवडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉकड्रीलवेळी शहरात ब्लॅकआऊट नाही
पुणे शहरात सायंकाळी चार वाजता मॉकड्रील होणार असून, यावेळी कुठेही ब्लॅकआऊट म्हणजेच लाईट घालवली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. मॉकड्रीलवेळी बचत कार्य, रेस्क्यू ऑपरेशनचा सराव घेतला जाणार आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार हे मॉकड्रील पार पडणार आहे. मॉकड्रीलसाठी तीन तासांचा वेळ दिला असला तरी, मदतकार्य हे लवकरात लवकर कसे करता येईल, हे पाहून एक ते दीड तासात हे सर्व मॉकड्रील पूर्ण होईल.
76 ठिकाणी आहेत सायरन
शहरांमध्ये सध्या ७६ ठिकाणी सायरन, म्हणजेच भोंगे आहेत. १९६५ च्या युद्धामध्ये हे बसवण्यात आले होते त्यावेळी ते वाजवले गेले होते. मात्र, बुधवारी होणाऱ्या मॉकड्रील वेळी केवळ तीन ठिकाणी, म्हणजेच विधान भवन, मुळशी पंचायत समिती व तळेगाव नगरपरिषद येथे सायरन वाजणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.