फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: पालघर जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मोखाडा पोलीस ठाण्याने अशाच एका कारवाईत तब्बल ४.८४ लाख रुपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १० जुलै २०२५ रोजी मोखाडा पोलिसांना नाशिकहून जव्हारकडे येणाऱ्या एका वाहनामधून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
सदर माहितीच्या आधारे पवारपाडा गावाजवळ नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी टाटा इंट्रा (MH-48-CQ-3034) ही संशयित गाडी थांबवली. गाडीचा चालक मुजिब अजगर मनियार (वय ४८, रा. मेन रोड, मोखाडा) याने गाडीत कुरकुरे, गाद्या व पडदे असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली असता, आतमध्ये २,३४,२०० रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला, जो राज्य शासनाने बंदी घातलेला आहे.
या कारवाईत गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी मिळून एकूण ४,८४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ११८/२०२५ नोंदवून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक पोकळे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, पो.उ.नि. श्रीकांत दहिफळे, प्रतिक पोकळे, तसेच स्थानीय गुन्हे शाखा पालघरचे अधिकारी आणि मोखाडा पोलीस ठाण्याचे पथक सहभागी झाले होते. या कारवाईने जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतूक व विक्रेत्यांना मोठा इशारा मिळाला असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.