फोटो - टीम नवराष्ट्र
पोस्टाकडे द्यायला पैसेच नाहीत !
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी
‘लाडकी बहीण’चे पैसे आले खरे पण पोस्टातून काय मिळेना
नाशिक : राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. मुळात हा लाभ घेण्यासाठी महिलांनी नवीन खाते उघडले आहेत. अनेकांनी पोस्टात खाते उघडले असून, पैसे काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. पोस्टात देखील गर्दी असून, महिलांना खात्यातील पैसे देण्यासाठी पोस्टाकडे रक्कमच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे महिलांना ताटकळत राहावे लागत आहे.
एकीकडे पोस्टात पैसे नसल्यामुळे महिलांना पैसे मिळत नसल्याचा प्रकार होत असतानाच अनेक महिलांचे आधार कार्ड सिडिंगमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळेही बँकांमध्ये पैसे अडकून पडले असून, सर्व्हर डाऊनमुळे आधार लिंकमध्ये अडचणी येत आहेत.
इतकेच नाही तर अंबासन येथील पोस्ट कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची हेळसांड होत असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. पोस्टात पैसे शिल्लक नसल्याने खात्यातून रक्कम काढण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींना ताटकळत बसावे लागते आहे. आता पोस्टाकडे कधी पैसे येतील व त्यातून कधी वाटप होईल याची प्रतीक्षा लागून आहे.
पोस्टाबाहेर लांबच लांब रांगा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते, अशा अनेक महिलांनी पोस्टात, बँकेत आपली खाती उघडली आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाल्यानंतर अनेकांचे पैसे खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे काढण्यासाठी देखील महिलांच्या बँक व पोस्टाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत.