संग्रहित फोटो
गडचिरोली : गेल्या काही महिन्यांपासून शहरात माकडांनी हैदोस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरांवर धुमाकूळ घालून वाहनांचीही तोडफोड केली. गेल्या पंधरवड्यापासून ‘वानरसेनेने’ अयोध्यानगरात धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि. 25) सायंकाळच्या सुमारास माकडाने एका तरुणीवर हल्ला करत जखमी केल्याची घटना उघडकीस आली. पूजा गावडे (वय 17) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
गेल्या महिनाभरापासून माकडांनी परिसरातील नागरिकांची घरे, सार्वजनिक वृक्ष, रस्त्यावर आपले बस्तान मांडल्याने सकाळी नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. पंधरा दिवसांपासून तर या वानरसेनेने शहरातील अयोध्यानगर परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. 12 ते 15 च्या संख्येत असलेल्या वानरसेनेचा हैदोस नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरत आहे. दररोज सकाळी दिवस उजाडताच माकडांचा उपद्रव सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना हातचे काम सोडून बंदोबस्तासाठी त्यांच्या धावाधाव करावी लागते.
विशेषतः महिला व बालकांना धोका निर्माण झाला असतानाच सोमवारी सायंकाळच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन घरी जात असलेल्या पूजा गावडे या तरुणीवर माकडाने हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रारंभी केवळ उच्छाद मांडणाऱ्या माकडांनी आता थेट व्यक्तींवर हल्ला चढविण्याइतपत मजल मारल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्यात वनविभाग सुस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे.