पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात जून महिन्याच्या 'या' तारखेपासून मान्सून सक्रिय होणार (सौजन्य : iStock)
पुणे : मागील 8-10 दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. पण, नंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळाले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र, मान्सूनची गती अजूनही मंदावलेली असून, राज्यात 12 ते 13 जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. मान्सून आठवड्याभरात जरी सक्रिय होणार असला, तरीही राज्यातील काही भागांमध्ये मात्र सरी बरसत आहेत. पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्याची गती सध्या मंदावली आहे. यावर्षी सरासरी 106 टक्के पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र, सर्वदूर पाऊस नसेल. राज्यात 12 ते 13 जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज सानप यांनी व्यक्त केला आहे.
अवकाळीमुळे शेतीचे नुकसान
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी सरकारने एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली.
सांगलीत पुन्हा पावसाची हजेरी
गेल्या ५ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून सांगलीमध्ये पुन्हा हजेरी लावली. अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरूवात झाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र, सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
पुण्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः चाकण आणि परिसरात, चार दिवसांच्या उसंतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुसरीकडे, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.