मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिंदे गटातील आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. तिथे जाऊन सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. थोड्याच वेळात ते आमदार आणि खासदारांसह मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत. अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह आज मुंबईहून गुवाहाटीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री आणि आमदार गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांची ही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.
आमदारांशी यावेळी पत्रकारांनी संवाद साधला असता पुढच्यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांनाही लवकरच दर्शनासाठी घेऊन जाऊ असे सांगितले. देवाचं दर्शन घेणं यामध्ये चुकीचं काही नाही. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळ ते टीका करत असल्याचे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. ठाकरे गटात उरलेल्या आमदार आणि खासदारांनाही लवकरच आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलं. ते आता आले असते तर त्यांना आम्ही घेऊन गेलो असतो. पण पुढच्या वेळेस आम्ही त्यांनी गेऊन जाऊ असे गवळी म्हणाल्या.






