सौजन्य - नवराष्ट्र टीम
अकलूज/कृष्णा लावंड : माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरु करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी देत आहोत. काम सुरु झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्याची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरु असल्याचे मत माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
गारवाडपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजी ठवरे, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, तुकाराम देशमुख, आप्पा कर्चे, दत्ता मगर, अजय सकट, सादिक सय्यद, सुरेश टेळे, डॉ. मारुती पाटील, विष्णू घाडगे जीवन जाणकर मामा घाडगे व शेकडोच्या संख्येने 22 गावातील नागरिक उपस्थित होते.
मोहिते पाटील पुढे म्हणाले, सरकारकडे हजारो कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत. पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नीरा देवघरच्या पाणी योजणेसाठी पैसे नाहीत. गेली 30 वर्षे सरकार माळशिरस तालुक्याला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मागील खासदारांनी पैसे मंजुर झाले, आता लगेच काम सुरु होईल म्हणून इथल्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले. पण या योजनेचे काम काही सुरु झाले नाही. पाणी काही आले नाही. मी आणि आमदार जानकर वाट्टेल ती किंमत मोजू पण तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.
आमदार जानकर म्हणाले, सरकारला जाग आणण्यासाठी, येथील शेतकऱ्यांची व्यथा, वेदना सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिंगोर्णी ते कोथळे अशी 103 किमी पायी संघर्ष यात्रा काढली. या नीरा देवघरच्या पाण्यासाठी मी विधानसभेत प्रश्नही विचारला. निरा देवघरच्या पाण्याच्या प्रकल्पाइतका कोणताही जुना प्रकल्प महाराष्ट्रात मागे राहिला नाही. गोसे खुर्द योजनेला सरकार 30 हजार कोटी रुपये देऊ शकते पण नीरा देवघरच्या प्रकल्पसाठी तुमच्याकडे 2 हजार कोटी रुपये नाहीत. सरकार मुद्दाम मतांच्या राजकारणासाठी हा प्रकल्प रखडवत आहे. पण आम्ही तुमच्या नरड्यात हात घालून डिसेंबर 26 पूर्वी पाणी शिंगोर्णीच्या डोंगरात सोडल्याशिवाय राहणार नाही. असं जानकर म्हणाले.
मान्यता, मंजुरी आणि निधी हा लबाड खेळ खेळत तुम्ही गेली 30 वर्षे येथील शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. येत्या 50 दिवसात जर या कामाचे टेंडर नाही निघाले तर तुमचे दात कसे पाडायचे ते आम्ही ठरवू. तुमच्या छाताडावर बसून आम्ही या गावात पाणी आणू. आजचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतो आहोत. पण काम सुरु झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रलयात घुसायला कमी करणार नाही, असाही इशारा जानकर यांनी दिला.
या गावांसाठी होतेय पाण्याची मागणी
पिंपरी, फडतरी-निटवेवाडी, लोणंद, लोंढे – मोहितेवाडी, गिरवी, भांब, रेडे, कण्हेर, गोरडवाडी, इस्लामपूर, कारुंडे, कोथळे, चांदापुरी, जळभावी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, झिंजेवस्ती, काळमवाडी व पिलीव.
नीरा देवघर प्रकल्पाचे भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस हे लाभक्षेत्र आहे. प्रकल्प सुरु होऊन कित्येक वर्षे झाली पण अजून याची कामे पूर्ण झाली नाहीत. राजकीय चढ उतार पाहून विविध खात्यामध्ये मंजुरीच्या फाईल अडकून पडल्या आहेत. या प्रकल्पची कामे पूर्ण होताच माळशिरस तालुक्याला 3 टीएमसी पाणी मिळेल अशी आशा आहे.