नाशिक : वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक आणि चुकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर खुलासा करण्यासाठी न्यायालयानं हे आदेश जारी केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला होता, असा आरोप केला होता. सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.
त्यानंतर भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दैनिक सामना या वृत्तपत्रातून बदनामी केल्याचा आरोप खासदार राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आज खासदार संजय राऊत हे स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात की वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.