खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर राज्याचे राजकारण जोरदार तापले आहे. वरळीमध्ये काल (दि.05) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रितपणे मेळावा पार पडला. यामध्ये अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या राज उद्धव यांना एकाच मंचावर पाहून मराठी माणसे सुखावली. महाराष्ट्रातून या क्षणाचे कौतुक करण्यात आले. यावरुन सत्ताधारी भाजपने जोरदार टीका देखील केली आहे. त्यांना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांच्या टीकेवर शनिवारच्या विजयी मेळाव्यानंतर ते गोंधळले आहेत. आता त्यांना रडावेच लागेल. त्यांचा रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू करा, आम्ही तुमचे कार्यक्रम लावू, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरुन देखील टीका करणाऱ्यांचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, वरळी डोम येथील विजयी मेळाव्यानंतर देशभरात हिंदी सक्तीविरोधात वातावरण तयार झाले. अनेक राज्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याने केंद्राच्या हिंदी सक्तीविरोधात लढण्याचे बळ मिळाल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. तसेच निवडणूकांसाठी असल्याचे देखील काही नेते म्हणले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये पक्षीय अजेंडा चालवला असल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. खासदार संजय राऊतांनी टीका करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. खासदार राऊत म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडकी बटाटे भरली आहेत. शनिवारच्या विजयी मेळाव्यानंतर ते गोंधळले आहेत. आता त्यांना रडावेच लागेल. त्यांचा रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू करा, आम्ही तुमचे कार्यक्रम लावू, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून विचित्र विधाने केली जात आहेत, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्त्र डागले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजयी सभेमध्ये कोणतेही राजकीय विधान किंवा राजकीय भूमिका मांडायची नाही असे सांगितलेले असताना देखील उद्ध ठाकरे यांनी राजकीय भाषण केली अशी टीका शिंदे गटाकडून केली जात आहे. यावरुन संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचे भाषण कोणाला कळले असले तर त्यांनीसुद्धा राजकीय भूमिका भाषणात मांडली आहे. सक्ती लावून तर दाखवा…, सत्ता तुमची विधानसभेत असेल, आम्ही रस्त्यावर आहोत…अशी विधाने त्यांनी केली. ही राजकीय विधाने आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी ५५ वर्षांपूर्वी हेच विधान केले होते. एअर इंडियात भूमीपुत्रांची भरती केली जात नव्हती. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, तुमची विमाने हवेत आहे, पण मुंबईतील रस्ते आमचे आहेत. हे सुद्धा राजकीय विधान होते,” असे मत संजय राऊत म्हणाले आहेत.