फोटो - ट्वीटर
धुळे : राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासून मात्र या योजनेवरुन वाद विवाद सुरु आहेत. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून हा चुनावी जुमला असल्याचा आरोप देखील केला. त्यानंतर पुण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये गफला झाला असेल तर त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शुभारंभ कार्यक्रमामध्ये परत संधी दिली तर हफ्ता आणखी वाढवू या आशयाचे वक्तव्य केले. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचा पोटातले ओठात येत आहे. आम्हाला सत्ता द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे सांगायला काहीही नाही. महिन्याला पंधराशे रुपये देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले असेल तर ती सरकारची चूक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी, सीबीआयकडून करावी, असे पत्र मला केंद्र सरकारला पत्र लिहावे लागणार आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
अदृश्य शक्तीने आमचे पक्ष चिन्ह ओरबाडले…
पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे बॅंकांमध्ये गोंधळ झाल्याचे देखील म्हटले. खासदार सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे बँकेत गोंधळ सुरू आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी घर, पक्ष फोडण्याचा प्रकार केला आहे. अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह ओरबाडून घेतले आहे. आजही सुप्रीम कोर्टात त्याबद्दलची केस सुरू आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर केली आहे.