खासदार सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाचे नाव घेत मटणाचे वक्तव्य केल्याने वारकरी सांप्रदाय नाराज झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Supriya Sule Mutton Statement : मुंबई : खासदार सुप्रिया सुळे या अनेकदा त्यांच्या नॉन व्हेज खाण्यावरुन वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकतात. नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान, खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा नॉन व्हेज खाण्याचा उल्लेख केला. मात्र यावेळी त्यांनी पांडुरंगाचा उल्लेख केल्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. यावर राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वारकरी सांप्रदायातील लोक देखील नाराजी व्यक्त करत आहेत.
काय म्हणाल्या खासदार सुळे?
नाशिकमधील दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुळे म्हणाल्या की, “मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ‘माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा,” असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वारकरी सांप्रदायातील ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात म्हणाले की, “खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. असे वक्तव्य करणे हे शहाण्या माणसांचं लक्षण नाही. वारकरी संप्रदायांनी सुप्रिया सुळेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये. बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकल नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार,” अशा शब्दांत ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
नाहीतर त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू
पुढे ते म्हणाले की, “या पृथ्वी तलावावर एकच विठ्ठल आहे दोन विठ्ठल नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे. याचा आम्ही वारकरी पाईक संघाकडून निषेध व्यक्त करतो. त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे विठ्ठलाला अभक्ष भक्षण चालतं अशी समज निर्माण होण्याची भीती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी खरात महाराजांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर खासदार सुळे यांनी माफी मागितली नाही तर वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू,” असा इशारा देखील ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे हभप खरात म्हणाले की, “वारकरी सांप्रदायाने लोकांना मद्य आणि मांस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्याकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भगवान विठ्ठल हा सर्वांचाच माता-पिता आहे. भगवान विठ्ठलाने सर्व जीव जंतू तयार केले आहेत. त्यांची हत्या करून भक्षण करणे हे त्या मात्यापित्याला म्हणजेच विठ्ठलाला नक्कीच आवडणार नाही. वारकऱ्यांच्या पांडुरंगाला बळी दिलेला चालत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पांडुरंग कोणता दोन पांडुरंग आहेत का असा प्रश्न कबीर महाराजांनी उपस्थित करत या वक्तव्याचा निषेध केला. मौस खाता हौस करी जोडूनी वैरी ठेवीला या संत वचनानुसार वारकरी संप्रदाय चालतो या वक्तव्याचा विपर्यास करून सुप्रिया सुळे यांनी केलेल विधान हे निषेधार्थ आहे,” असे स्पष्ट मत ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी व्यक्त केले आहे.