बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : बारावीपर्यंत मी फार लाजाळू होते. त्यामुळे नेहमी मी आईचा पदर धरायची. मात्र, मी प्रचंड वाचन करून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. मात्र, आता आईला माझा पदर पकडून ‘ कूल डाऊन’ म्हणावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी प्रचंड वाचन करून स्वतःमधील आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.
भवानीनगर येथील श्री छत्रपती मंगल कार्यालयात इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने दहावीच्या तालुक्यातील विविध शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी कथन केल्या. यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, बाळासाहेब पाटील, प्रताप पाटील, प्रदीप गारटकर, रणजित निंबाळकर, विक्रम निंबाळकर, परशुराम रायते, एस.बी.थोरात, शुभम निंबाळकर, प्राचार्य रमेश मचाले, अमोल पाटील, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर अवांतर वाचनही विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. शालेय अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे खेळ व इतर गोष्टींना वेळ दिला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची स्पर्धा करून आपला व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करणाऱ्या गोष्टी आत्मसात कराव्यात. बारामती मतदारसंघात लवकरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल.विद्यार्थ्यांचे ज्ञानविश्व अधिक मजबुत होण्यासाठी एक दिवस शाळेसाठी देणार आहे. यशाला शॉर्टकट नसतो. त्यासाठी मेहनत महत्वाची असते, असे सुळे म्हणाल्या.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळते. परिणामी, विद्यार्थी ध्येय गाठण्यात यशस्वी होतात. विद्यार्थ्यांचा सन्मानामुळे आत्मविश्वास वाढतो. हाच आत्मविश्वास जीवनाला दिशा देतो. विद्यार्थ्यांनी आई-वडीलांच्या कष्टाचे सार्थक करावे, असे आवाहन भरणे यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत काटे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले.