सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा, खासदार विशाल पाटील यांचा पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
सांगली : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून पोलीस ठाणी गुन्हेगारांना अभय देणारी केंद्रे बनली आहेत, असा गंभीर आरोप करत खासदार विशाल पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलीस अधीक्षकांना सांगलीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पाठवले आहे की शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी?” असा थेट सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पाटील म्हणाले, वेदांत बंडगर हत्येच्या दिवशी दोन उपअधीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त नागेवाडी आणि भाग्यनगर परिसरात शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनींची मोजणी करण्यासाठी तैनात होता. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष झाले. “रात्रीच्या वेळी जमिनी मोजण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
वेदांत बंडगर हत्येतील मुख्य आरोपी निलेश गडदे याचे राजकीय संबंध, जिल्हाबंदी असतानाही त्याची जिल्ह्यातील मुक्त वावर, त्याला मिळालेला जामीन आणि बंडगर कुटुंबाचा पत्ता त्याच्यापर्यंत कसा पोहोचला, याची उत्तरे पोलिसांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
कवठेपिरान येथील अपघात प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी पोलिसांवर आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. अपघातातील संशयित शासकीय अधिकाऱ्याला तब्बल ३६ तासांनंतर ताब्यात घेण्यात आले, मात्र त्याची मद्यपान चाचणीही करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांवर टीका करताना पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या विकासापेक्षा भाजपच्या राजकीय विस्तारावरच भर दिला जात आहे. घरपट्टी वाढ होणार नसल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असून महापालिका प्रशासनानेही लोकप्रतिनिधींच्या चर्चेचा दावा करून चुकीची माहिती दिली, असा आरोप त्यांनी केला.
सांगली जिल्ह्यातील काही खून प्रकरणांमध्ये एक धक्कादायक पॅटर्न दिसून येत असल्याचा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला. खून घडल्यानंतर काही तासांत एखादा अल्पवयीन पुढे येऊन गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारतो, त्याला बालसुधारगृहात पाठवले जाते आणि मूळ सूत्रधार नामानिराळे राहतात, असा आरोप त्यांनी केला. वेदांत हत्याकांडातही अशाच प्रकारचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
कृष्णा नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि त्याच परिसरातील पंपिंग स्टेशनचा मुद्दा उपस्थित करत पाटील यांनी महापालिकेला धारेवर धरले. धुळगाव पाणीपुरवठा योजना सुरू असल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी दररोजच्या वीज वापराचा आणि पंपाच्या कार्यरत स्थितीचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार मुरल्याचा गंभीर आरोप करत पाटील म्हणाले, “प्रत्येक पोलीस ठाण्यात कलेक्शनसाठी एजंट नेमले गेले आहेत. पैशांची टक्केवारी खालपासून वरपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याऐवजी व्यवहार आणि सेटलमेंटचेच राजकारण सुरू आहे. परिणामी पोलिसांवरील जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे.”






