वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’, नेमका काय आहे प्रकल्प?
महाराष्ट्रातील वाढवणजवळ देशातील सर्वात मोठे बंदर विकसित होणार आहे. याअनुषंगाने वाढवणलगत आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन वाढवण विकास केंद्राचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने वाढीव क्षेत्राबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वाढवण बंदरालगत एक नवीन महानगर, म्हणजेच एक मुंबई विकसित होणार आहे.
वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’ यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून त्याचे पुढील सर्वेक्षण सुरु आहे. तसेच बुलेट ट्रेन, आणि कोस्टल रोड वाढवणपर्यंत नेण्याचीही योजना असल्याने हा भाग एक मोठं शहरी केंद्र बनेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
मुंबई, ठाणे आणि पुणे या पारंपरिक औद्योगिक केंद्रांपलीकडे, राज्य शासनाने आता टियर २ आणि 3 शहरांमध्ये औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर हे आता ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उद्योगाचे केंद्र बनले असून अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या ठिकाणी आर्थिक वाढीसाठी पूरक वातावरण तयार होत आहे. गडचिरोली हे देशातील नवीन स्टील सिटी म्हणून उभारले जात आहे, जिथे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. नागपूर, नाशिक आणि धुळे यांसारख्या शहरांमध्येही माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि अन्य क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होत आहे. या सर्व शहरांमध्ये केवळ उद्योगच नव्हे, तर दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, करमणुकीच्या सुविधा यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या गतीमान प्रशासनामुळे विविध उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमातंर्गत अतिशय चांगली अंमलबजावणी सर्व प्रशासकीय विभागांनी केली असून सध्या प्रशासनासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक विभागाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दीर्घकालीन ध्येयासाठी आपापल्या विभागांची उद्दिष्टे, कृती आराखडा तयार करायचे आहेत. या योजनेत तीन टप्पे असून त्यात दीर्घकालीन दृष्टिकोन: महाराष्ट्र 2047 तसेच मध्यम कालावधीचा आराखडा: महाराष्ट्र 2035 आणि तत्काल कृती आराखडा: महाराष्ट्र 2029 या तीन टप्प्यांचा समावेश असेल. या सर्व टप्प्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असून त्याचा प्रशासनावर आणि उद्योगांवर होणारा परिणाम, आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी यांचा विचार केला जात, असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.






