कृत्रिम हातांना तंत्रज्ञानाचा सजीव आधार! मुबंईत एमजीएमच्या उपक्रमाला प्रतिसाद
मुंबई, नीता परब: अपघातात हात-पाय गमवलेल्या तसेच शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांगांसाठी विज्ञानाच्या साह्याने कृत्रिम हात-पाय व अन्य अवयव शरीराला जोडले जात असले तरी दिव्यांगांना काहिसा दिलासा मिळतो. पण आता या निर्जीव कृत्रिम अवयवांत प्रगत तंत्रज्ञानातून सजीवपणा आणला जात आहे. सजीव अवयवांप्रमाणेच हे अवयवही हालचाल करणार आहेत. नवी मुंबईच्या कामोठे एमजीएम इन्स्टिट्यूटच्या प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागामध्ये सध्या क्लिनिकल ट्रायल उपक्रमाअंतर्गत हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. देशात पहिल्यांदाच पेटंट केलेल्या ग्रिप्पी हॅण्डचे क्लिनिकल मूल्यांकन या विभागाच्या प्रमुख डॉ. उत्तरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.
भारतात रोबो बायोनिक्सद्वारे तयार केलेला ग्रिपी हा विशेष कृत्रिम हात आहे. एमजीएमच्या एका योजने अंतर्गत तो विनामूल्य दिला जातो. चाचणीद्वारे हात सुरक्षित असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. ग्रिपीला खऱ्या हाताप्रमाणे स्पर्श जाणवतो आणि विविध प्रकारचे ग्रीप करण्यास तो सक्षम आहे. हा हात हलका, वापरण्यास सोपा आहे. ग्रिपीमध्ये स्वतःचे एमएजी सेन्सर्स आहेत. सजीव हाताच्या तुलनेत 60% कमी वेळेत वापरण्याचे कौशल्य यात विकसित करण्यात आले आहे.
हातापायांना सतत मुंग्या येतात? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध
एमजीएमच्या विद्यापीठ विभागातील प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागात बॅचलर इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (बीपीओ) हा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना तो व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यांसह कार्यक्षम बनवितो. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना ते आवश्यक सेवा जागतिक स्तरावर पुरवू शकतात. या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे क्लिनिकल इंटर्नशिप, जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लिनिकल सेवेचा अनुभव मिळतो. यात रुग्णांचे मूल्यांकन, प्रीस्क्रिप्शन, मापन, निर्मिती, फिटमेंट आणि तपासणी यांचा समावेश होतो. रुग्णांना आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि समाजासाठी उपयुक्त बनविण्यात ही विद्याशाखा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे विभागप्रमुख डॉ. उत्तरा देशमुख यांनी सांगितले.






