मुंबई न्याय यात्रा (फोटो- ट्विटर)
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांवरून ढवळून निघत आहे. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबईत आपली पकड मजबूत करण्यासाठी व महायुती सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरत ‘मुंबई जोडो न्याय यात्रेचे आयोजन केले होते. त्या यात्रेची आज मुंबईत सांगता झाली. यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.
१० ऑगस्ट २०२४ पासून ‘मुंबई न्याय यात्रे’ची सुरुवात करण्यात आली. तर आज या यात्रेची सांगता खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने ही यात्रा काढली होती. या यात्रेचे नेतृत्व हे खासदार वर्षा गायकवाड करत होत्या. मुंबई महापालिकेतील सुरू असलेली लूट, महायुती सरकारच्या भोंगळ कारभार, कायदा व सुवव्यस्था असे अनेक मुद्दे घेऊन खासदार गायकवाड जनतेपर्यंत गेल्या. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असे विधान केले आहे.
‘मुंबई न्याय यात्रे’च्या सांगतेवेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”मुंबईत पहिल्यांदाच इतकी ऐतिहासिक यात्रा निघाली. मुंबईकरांचे प्रश्न सर्कारपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. आज यात्रेची सांगता होत असली तरी, हे इथेच संपणार नाही. येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात या यात्रेचे नियोजन करू. या यात्रेच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचता आले. त्यांचे प्रश्न समजून घेता आले. यात्रेच्या माध्यमातून समजलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सांगलीमध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण छान प्रकारे झाले. तसेच सध्या राज्यातील परिस्थिती बघता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.”
मुंबई भ्रष्टाचारमुक्त करूनच राहू,
मुंबईकरांना न्याय मिळवूनच देऊ,
त्याशिवाय शांत बसणार नाही,
सत्य-न्यायाचा संघर्ष थांबणार नाही..!लढा सुरूच राहणार.. लढू आणि जिंकू..!#INDIAJeetega 🇮🇳#MumbaiNyayYatra pic.twitter.com/DV7Zka0cM6
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 5, 2024
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तसेच राज्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. सध्याचे राजकारण हे लाडकी बहीण योजना, राजकोट किल्ल्यावरील दुर्घटना, कायदा व सुव्यस्था याचा उडालेला बोजवारा अशा घटनांभोवंती फिरत आहे. मध्यंतरी काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी अत्यंत चुरशीची असणार आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला निवडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.