एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांची टीका
Ganesh Naik on Eknath Shinde: “एकनाथ शिंदे यांनाही लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, ज्यांना ती लागलेली आहे, त्यांनीती योग्यरित्या टिकवली पाहिजे, असा शब्दांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. पण या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद सुरूच असल्याचे दिसत आहे.
गणेश नाईक म्हणाले, ” प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं यापेक्षा कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्त्वाचं आहे, असा टोला गणेश नाईक यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक ठाणे जिल्ह्यासह त्यांच्या मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. गणेश नाईकांचे जनता दरबाराचे ही कौतुक होताना दिसत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरून विरोधकांनीही शिंदे सेनेला डिवचले आहे. या विधानानंतर आता शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना यश मिळते, यासाठी नेते सज्ज झाले आहेत. मात्र, त्यापूर्वी महायुती नेत्यांमधील फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. पालघर-ठाणे जिल्ह्याचे आपण पालकमंत्री असताना शिंदेसह माजी मंत्री विष्णु सावरा आणि खासदार चिंतामण वनगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होत असत, अशी आठवण नाईकांनी करून दिली. त्यानंतर त्यांनी शिंदेंकडे बोट दाखवत म्हटलं की, “प्रत्येकालाच लॉटरी लागत नाही, पण प्रत्येकाने कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. जनतेची नजर त्या टिकवण्यावरच असते.”
Sanjay Raut News: ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी…; संजय राऊतांनी तोफ डागली
एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद हा नवीन नसून जुना आहे. ठाणे जिल्ह्यातील सत्ता आणि वर्चस्वाची लढाई हे या संघर्षाचे प्रमुख कारण मानले जाते. ठाणे जिल्ह्यातील गावांच्या हद्दी, आर्थिक भार आणि प्रशासनात प्रमुख कोण? या मुद्यांवरून दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरही ठाण्यात सत्ता संघर्ष उफाळला होता. गणेश नाईक यांनी १४ गावांचे नवी मुंबईमध्ये विलिनीकरण हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता.
नाईक यांची ‘जनता दरबार’ मोहिम देखील त्यांना सत्ता दाखवण्याचे माध्यम असल्याचे मानले गेले. त्यामुळे वाद अधिकच गडद झाला. यापूर्वी ठाण्यातील एका बैठकीत विविध प्रशासकीय मुद्द्यांवरून आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईवरून शिंदे–नाईक संघर्ष समोर आला होता.